निपाणीतील ‘थळोबा पेठ’चा ३७ दिवसांचा गणपती

अमोल नागराळे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

निपाणी - चतुर्थीला गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व विजयादशमीला विसर्जन, अशी येथील श्री थळोबा पेठ गणेशोत्सव मंडळाची ३७ दिवसांच्या उत्सवाची परंपरा आहे. तब्बल ३०० वर्षांपासून हे वेगळेपण जपण्यात येत असून, यंदा ३० सप्टेंबरला विजयादशमीच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन होणार आहे.

निपाणी - चतुर्थीला गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व विजयादशमीला विसर्जन, अशी येथील श्री थळोबा पेठ गणेशोत्सव मंडळाची ३७ दिवसांच्या उत्सवाची परंपरा आहे. तब्बल ३०० वर्षांपासून हे वेगळेपण जपण्यात येत असून, यंदा ३० सप्टेंबरला विजयादशमीच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन होणार आहे. गेल्या पाच वर्षांत येथील उत्सवाचे स्वरूप भव्य बनले असून, भाविक-भक्तांचा ओघ वाढला आहे. उत्सवानिमित्त बुधवार (ता. २०) महाप्रसाद झाला.

निपाणीचे जनक सिद्धोजीराजे देसाई निपाणीकर सरकार यांनी प्रथम या मूर्तीची स्थापना केली होती. त्यानंतर येथील तरुणांसह कार्यकर्त्यांनी मूर्ती प्रतिष्ठापनेसह विसर्जनाच्या नियमांची परंपरा आजवर जपली आहे. येथे रोज सकाळी व सायंकाळी पूजा, आरती, नैवेद्य होतो. प्रत्येक आरती शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याची परंपरा आहे. अनेक वर्षे छोट्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला गेल्या काही वर्षांपासून भव्य स्वरूप प्राप्त होत आहे. नवरात्रोत्सवात देखाव्यासह विविध कार्यक्रम आयोजनावर संयोजक भर देत आहेत. यंदाही भजनासह देखाव्याचे आयोजन नवरात्रोत्सवात केले आहे. 

वेगळेपणाचा वसा जपला
शहराच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिकसह सर्वच बाबतीत थळोबा पेठेला स्थान आहे. थळोबा पेठ गणेशोत्सव मंडळाने आजही गणेशोत्सवातील वेगळेपणाचा वसा जपला आहे. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये गणेशोत्सव सुरू केला. पण, त्याच्याही पूर्वीपासून येथे मूर्ती प्रतिष्ठापना झाली असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे आतापर्यंत मंडळाने कार्यकारिणी ठेवली नसून, सर्व मंडळांसह पेठेतील कार्यकर्ते उत्सव काळात सेवाभावी वृत्तीने परिश्रम घेत आहेत.

३७ व्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनाची ३०० वर्षांची परंपरा असली तरी मंडळाने आजवर प्रसिद्धीपासून दूर राहून कार्य चालविले आहे. गेल्या काही वर्षांत महाप्रसाद, नवरात्रोत्सवासह उपक्रमांची संख्या वाढविल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. लोकाश्रयाच्या माध्यमातून उत्सवाचे स्वरूप वाढत असल्याने त्यासाठी कार्यकारिणी ठेवलेली नाही. मंडळासह पेठेतील सर्वांकडून यासाठी सहकार्य लाभत आहे.
- संतोष मेस्त्री, कार्यकर्ते, थळोबा पेठ गणेश मंडळ