'वाय-फाय' सेवा देणारी राज्यातील एकमेव ग्रामपंचायत शिरगुप्पी 

wi fi
wi fi

चिक्कोडी : शिरगुप्पी (ता. अथणी) ग्राम पंचायत बेळगाव जिल्ह्यात सतत नवनवे उपक्रम व योजना राबविण्यात अग्रेसर असते. आता गावातील सर्व नागरिकांना मोफत इंटरनेट वापरता येण्यासाठी "वाय फाय' सेवा स्वातंत्र्यदिनानिमित्त आज (ता.15) पासून राबविण्यात येत आहे. अशी सुविधा देणारी ही कर्नाटक राज्यातील पहिली ग्राम पंचायत ठरली आहे. तसेच ग्राम पंचायतीत खातेदार असलेल्यांच्या निधनानंतर तातडीने 10 हजाराची मदत देण्याच्या योजनेचा प्रारंभही होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने "वाय फाय' योजनेसाठी खर्च उचलला आहे. तर 10 हजाराच्या मदतनिधीसाठी कोणतीही सरकारी मदत घेण्यात आलेली नाही. ग्राम पंचयातीच्या करातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

विविध विधायक योजना राबविण्याच्या हातखंड्याने गुगलसह विविध आंतरराष्ट्रीय पातळीवरील 9 पुरस्कार शिरगुप्पीने प्राप्त केले आहेत. ग्राम पंचायत सदस्यांच्या सेवा करण्याच्या खऱ्या तळमळीमुळे गावाचा नावलौकीक वाढला आहे. अंत्यसंस्कारासाठी सरकारची योजना असूनही ती कुचकामी ठरत असल्याने त्यापुढे जावून मयतांच्या वारसांना तातडीने व कोणत्याही कागदपत्राशिवाय 10 हजार रुपये देण्याची योजना हाती घेतली आहे. खातेदारांच्या करासोबत दरवर्षी 100 रुपये जादा घेण्यात येणार आहे. पाणीपट्टी व घरफाळ्यासोबत पावतीत "विमा' असा कॉलम करण्यात आला असून त्यात 100 रुपये घेऊन योजना राबविली जाणार आहे. 

खातेदार असणे ही एकच अट 
विमा व सरकारी योजनेतून लाभाची रक्कम देताना कागदपत्रांची व हप्ता भरण्याची सक्ती असते. सरकारी मदत मिळण्यास उशिर होतो. विषेश म्हणजे चार वर्षे कर भरला नसला तरी खातेदाराच्या मृत्यूनंतर तातडीने 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. कर भरण्यास विलंब झालेला असला तरी कागदपत्रांसाठी वारसांना पंचायतीत यावे लागतेच. त्यावेळी ही रक्कम जमा करुन घेण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी जात, गरिब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसून सर्वच खातेदारांच्या वारसांना याचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ खातेदार असणे ही एकच अट आहे. 

"वाय फाय'साठी 8 टॉवर 
गावात केंद्र सरकारच्या चौपाळ योजनेतून "वाय फाय' सेवा 15 ऑगष्टपासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारने निधी खर्च केला आहे. ठराविक अंतरावर गावात 8 टॉवर उभारण्यात आले आहेत. 120 मीटर रेंज असलेले हे टॉवर आहेत. यामुळे गावातील कुणालाही मोफत इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. 

गरिब असो वा श्रीमंत कोणाचाही मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी व इतर कार्यासाठी निधीची गरज असते. कुटुंबीयांकडे पैसे नसले तरी इतरांकडून घेऊन खर्च करावा लागतो. मात्र पैशाअभावी गैरसोय होवू नये, यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला आहे. योजना यशस्वी झाल्यानंतर घरातील प्रत्येक नागरिकांसाठी योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. 
-रामगौडा पाटील, अध्यक्ष, बेळगाव जिल्हा ग्राम पंचायत सदस्य संघटना व ग्राम पंचायत सदस्य शिरगुप्पी 

शिरगुप्पी ग्राम पंचायतीचे उपक्रम 
*14 वर्षांवरील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण 
*शुध्द पाण्याचा पुरवठ्यासाठी 3 केंद्रातून सात ठिकाणी सोय 
*10 वर्षापासून डिजिटल उतारे देण्याची सोय 
*10 वर्षापासून "कॅशलेस' व्यवहार 
*ग्राम सभेचे "लाईव्ह टेलिकास्टींग' 
*सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी गावात 30 ध्वनिक्षेपक. 
*कर भरल्याशिवाय उतारा वितरण बंद योजना 
*गावातच डिजिटल ग्रंथालयाची सोय 

मिळालेले पुरस्कार 
*गुगल पुरस्कार 
*राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 
*निर्मल ग्राम पुरस्कार (दोन वेळा) 
*रजत नैर्मल्य पुरस्कार 
*गांधीग्राम पुरस्कार (दोन वेळा) 
*नैर्मल्य पुरस्कार 
*पंचायत सशक्तीकरण पुरस्कार (दोन वेळा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com