भाजपचे कार्यकर्ते गावोगावी मुक्‍कामी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

सातारा - गावागावांत जाऊन केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी गेल्या अडीच वर्षांत आणलेल्या विविध योजनांची माहिती प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील ५३० प्रशिक्षित कार्यकर्ते त्यासाठी २५ मे ते दहा जून या कालावधीत गणनिहाय गावागावांत मुक्काम ठोकणार आहेत.

सातारा - गावागावांत जाऊन केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी गेल्या अडीच वर्षांत आणलेल्या विविध योजनांची माहिती प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील ५३० प्रशिक्षित कार्यकर्ते त्यासाठी २५ मे ते दहा जून या कालावधीत गणनिहाय गावागावांत मुक्काम ठोकणार आहेत.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत दोन्ही सरकारांनी सर्वसामान्य माणसांसाठी काही महत्त्वपूर्ण योजना आणल्या आहेत. या योजनांची माहिती प्रत्येक गावांतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे, तसेच या योजनांचा लाभ कसा घेता येईल, याची जाणीव व जागृती करण्याकडे भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यात पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना, शेती विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना आदींचा समावेश आहे. या योजनांबाबत  जागृती करून त्यांचा लाभ जास्तीतजास्त लोकांना कसा मिळवून देता येईल, यावर भर देणार आहेत.

यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक तालुक्‍यातील  कार्यकर्त्यांची निवड करून त्यांची ‘टीम’ बनविली आहे. जिल्ह्यातील ५३० कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या २५ मे ते १० जून या कालावधीत हे प्रशिक्षित कार्यकर्ते गणनिहाय प्रत्येक गावांत विखरले जातील. गावात मुक्कामी राहून प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजना काय आहेत. त्यांची अंमलबजावणी कशी होते. त्याचे लाभार्थी होण्याचे निकष व त्याचा लाभ कसा घ्यायचा ही सर्व माहिती दिली जाणार आहे. सध्या भारतीय जनता पक्षाने प्रत्येक निवडणुकीत आपले उमेदवार व पॅनेल उभे करण्याची भूमिका ठेवली आहे. त्यामुळे आजवर निवडणुका बिनविरोध करून कार्यकर्त्यांची सोय करण्याचे राष्ट्रवादी व काँग्रेसचे मनसुबे भाजपने धुळीस मिळविल्याचे चित्र आहे.

आगामी निवडणुकांत भाजपला फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे हे संपर्क अभियान यशस्वी झाल्यास आगामी निवडणुकीसाठी त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होणार आहे.