आयारामांच्या जीवावर ‘भाजप’ सवार

- श्रीकांत कात्रे
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघातील आमदारांची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढलेल्या या निवडणुकीने अनेक जुन्या राजकीय समीकरणांना छेद देताना नव्यांनाही जन्म दिला. राजकारणाच्या या मतदारसंघनिहाय बदलत्या रंगांचा वेध आजपासून... 
 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघातील आमदारांची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढलेल्या या निवडणुकीने अनेक जुन्या राजकीय समीकरणांना छेद देताना नव्यांनाही जन्म दिला. राजकारणाच्या या मतदारसंघनिहाय बदलत्या रंगांचा वेध आजपासून... 
 

काँग्रेससंस्कृती रूजलेल्या जिल्ह्याने केशरी रंगाला ग्रामीण राजकारणाच्या आखाड्यात सामावून घेतले आहे. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या सभागृहात आजतागायत औषधालाही न सापडणाऱ्या भारतीय जनता पक्षाने शिरकाव केला आहे. मूळ किंवा निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षाही आयारामांच्या जीवावर पक्षाचे हातपाय पसरण्याचा प्रयत्न यापुढील काळात होणार, विधानसभा निवडणुकीची तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले, तर भाजप तशी चाल पुढेही सुरू ठेवेल, यात शंका असण्याचे कारण नाही.

कारण विधानसभेच्या आठ मतदारसंघांचा विचार केला तर मतदारसंघावर पकड ठेवण्यासाठी आमदारांनी केलेल्या प्रयत्नांना सर्वच ठिकाणी अपेक्षित यश साधता आलेले नाही. काही ठिकाणी तर आमदारविरोधी गट अधिक बळकट झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली असली तरी त्या पक्षालाही वर्चस्व राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. चिंध्या झालेल्या काँग्रेसला तर पायाभरणीपासून श्रीगणेशा करावा लागणार आहे. शिवसेनेने आत्मपरीक्षण केलेच नाही तर शंभूराज देसाईंच्या ताकदीनुसार शिवसेना पाटणपुरतीच उरणार आहे.
 

दक्षिणोत्तर कऱ्हाडात दोन्ही काँग्रेसवर वर्मी घाव

बाळासाहेब पाटील यांच्यापुढे आव्हानच
कऱ्हाडमध्ये दक्षिणोत्तर मतदारसंघात दोन्ही काँग्रेसच्या पिछेहाटीने भाजपसाठी वाढीचा मार्ग मोकळा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडी हे चार प्रमुख पर्यांय लोकांपुढे होते. लोकांनी जिल्हा परिषदेसाठी चौघांची समान विभागणी केली. पंचायत समितीसाठी त्रिशंकू स्थिती निर्माण करतानाच सत्तेच्या चाव्या विलासराव पाटील उंडाळकर यांच्या आघाडीकडे दिल्या आहेत. कऱ्हाड उत्तरमध्ये एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर या निकालाने काही आव्हान निर्माण केले आहे. कोपर्डे हवेली गट हा त्यांचा बालेकिल्ला काँग्रेसने घेतला आहे, तर वाघेरी गण भाजपकडे गेला आहे. सैदापूर गटही त्यांच्यापासून दूर जाताना हजारमाची गण भाजपला आणि सैदापूर गण काँग्रेसने हिरावून घेतला आहे. पुसेसावळीसह वाठार किरोली गटातही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. सातारा तालुक्‍यातील गटांतही श्री. पाटील यांना धक्काच आहे. कारण वर्णे गट आणि गण दोन्हींत भाजपने डंका वाजविला आहे. नागठाण्याचा गट उदयनराजेंच्या आघाडीने जिंकला तर त्यातील एक गण भाजपने घेतला आहे. पूर्ण मतदारसंघाचा विचार केल्यावर पाटील गटाने विजय मिळविला त्याठिकाणी भाजपने घेतलेली मते लक्षणीय आहेत. श्री. पाटील यांच्या एकतर्फी ताकदीला काँग्रेसने थोडा आणि भाजपने थोडा शह दिला हे निवडणुकीत स्पष्ट झाल आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा गडही धोक्‍यातच 
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात भाजप आणि कऱ्हाड तालुका विकास आघाडीने आघाडी केलेल्या दोन्ही काँग्रेसची जिरवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा मतदारसंघ. विधानसभेतील ताकद राखता येणार नाही, या जाणिवेतूनच या मतदारसंघात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतले खरे; पण विलासराव पाटील उंडाळकर यांनी विधानसभेतील कसर भरून काढण्याचा चंग बांधत आपल्या गटाला नवसंजीवनी मिळवून दिली आहे.

कऱ्हाड दक्षिणमधील गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला थाराच मिळाला नाही. विंग, कोयना वसाहत, वारुंजी आणि सैदापूर या चार गणांत काँग्रेसचे मान राहिला. रेठरे बुद्रुक, शेरे, कार्वे, गोळेश्‍वर या चार गणांतून भाजपने पंचायत समितीत प्रवेश मिळविला आहे. उंडाळकर यांच्या आघाडीने तांबवे, सुपने, कोळे, सवादे, येळगाव, काले, कालवडे हे सात गण जिंकून पुन्हा आपली ताकद सिद्ध केली आहे. ही परिस्थिती पृथ्वीराज चव्हाण यांना विचार करायला लावणारी आहे.  ग्रामीण भागाबरोबरच या मतदारसंघात कऱ्हाड शहराचा भाग येतो. पालिका निवडणुकीत शहरात भाजपची ताकद वाढविणारा निकाल मिळाला. नगराध्यक्षपदही भाजपकडे आहे. त्यामुळेच श्री. चव्हाण यांना शहरी व ग्रामीण भाजप, राष्ट्रवादीचे गटतट आणि उंडाळकरांचा गट अशा अनेक आघाड्यांशी सामना करावा लागणार आहे.