आपसांतील भांडणामुळे काळवीट यमसदनी 

विजयकुमार सोनवणे 
मंगळवार, 10 एप्रिल 2018

हृद्यक्रिया बंद पडल्याने दोन हरिण मृत्युमुखी पडले, कुत्रे चावल्यामुळे नाही, असा अहवाल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांनी दिला आहे.

सोलापूर - महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील एका काळवीटाचा मृत्यू आपसांतील भांडणामुळे झाला. तर हृद्यक्रिया बंद पडल्याने दोन हरिण मृत्युमुखी पडले, कुत्रे चावल्यामुळे नाही, असा अहवाल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांनी दिला आहे. ही घटना गेल्या पंधरवड्यात झाली होती. 

काळवीट प्रकरणावरून अभिनेता सलमान खान यास तुरुंगवास सोसावा लागला असल्याने ही बाब सभागृह नेते संजय कोळी यांनी गांभीर्याने घेतली. त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. त्यानुसार डॉ. ताजणे यांनी अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे, प्राणीसंग्रहालयाची भिंत पडली असल्यामुळे मोकाट कुत्रे हरिणांच्या पिंजऱ्याजवळ आले होते. त्यामुळे एक लहान चितळ आणि मोठे काळवीट मरण पावले. शवविच्छेदन केले असता, त्यांच्या अंगावर कुठेही कुत्रा चावल्याचे व्रण नव्हते. हृदयक्रिया बंद पडल्याने हरीण मरण पावल्याचे स्पष्ट झाले. 

दुसऱ्या घटनेत 25 मार्च 2018 ला आपसांतील भांडणामुळे एका काळवीटाचा मृत्यू झाला. ही नैसर्गिक घटना आहे. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर एका सुरक्षा रक्षकाची रात्रीच्या गस्तीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही पंधरा दिवसात करण्यात येत आहे, असेही डॉ. ताजणे यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. 

चोरील्या गेलेल्या बदकाच्या बदल्यात भरपाई ही पद्धत चुकीची आहे. उद्या खाण्यासाठी हरिण कुणीही चोरून नेईल आणि भरपाई देतो म्हणेल, हे कायद्यात बसते का? चोरीच्या प्रकरणात संबंधितांवर पोलिसांत गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. गरज भासल्यास वन्यजीव संरक्षण कायद्याचाही आधार घ्यावा. 
- संजय कोळी, सभागृह नेता 
सोलापूर महापालिका 

बदकाची भरपाई कशी करणार ? 
या प्राणीसंग्रहालयातून तीन बदक चोरीला गेली. सुरक्षा कंपनीने भरपाई देण्याची तयारी दर्शविल्याने पोलिसांत फिर्याद दिली नाही, असेही डॉ. ताजणे यांनी अहवालात म्हटले आहे. बदकांच्या बदल्यात कंपनी काय भरपाई देणार, तशी तडजोड करता येते का? प्राणी अथवा पक्षी चोरीला गेल्यावर जबाबदार व्यक्तीकडून काय भरपाई घ्यायची तरतूद वन्यजीव कायद्यामध्ये आहे का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Blackbuck are died in fight