बॉलिवूड स्टार्स मराठी सिने निर्मितीकडे!

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार 
कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या साहित्यिकाने. याबाबतच्या स्मृतींना आता पुन्हा उजाळा मिळू लागला आहे. 

रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार 
कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या साहित्यिकाने. याबाबतच्या स्मृतींना आता पुन्हा उजाळा मिळू लागला आहे. 

कोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असलेला ‘७२ मैल एक प्रवास’ हा चित्रपट २०१३ ला प्रदर्शित झाला. अर्थात त्याची तयारी तत्पूर्वी कैक महिने सुरू होती. अक्षयकुमार, ट्विंकल खन्ना आणि अश्‍विनी यार्दी यांच्या ‘ग्रेझींग गोट’ या प्रॉडक्‍शन हाऊसतर्फे प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. त्याने जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कारांची लयलूट केली. ज्या (कै.) डॉ. अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला होता, ते कोल्हापूरचे. ते संस्कृत विषयाचे प्राध्यापक आणि राहायला जवाहरनगरातील कक्कया हायस्कूलजवळ. १९६८ ला शिवाजी विद्यापीठातून संस्कृत विषयात बीए, १९७१ ला संपूर्ण संस्कृत विषयातून एमए आणि १९८२ ला संस्कृत विषयातच पीएचडी त्यांनी संपादन केलेली. गोखले कॉलेज, राजाराम कॉलेज, औरंगाबाद शासकीय महाविद्यालय, एल्फिस्टन कॉलेज, विदर्भ महाविद्यालय आदी ठिकाणी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले. एकूण अठरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांतील ‘७२ मैल’ आणि ‘मेलेलं पाणी’ या कादंबऱ्या विशेष गाजल्या. दिग्दर्शक राजीव पाटील यांना ‘७२ मैल’ या कादंबरीने भुरळ घातली आणि अक्षयकुमारलाही ही कथा आवडली. त्यावर त्यांनी चित्रपटही पूर्ण केला आणि तो जगभरात नेला. 

दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत ‘बालक-पालक’ बरोबरच रितेश देशमुखची निर्मिती असलेला ‘यलो’ असेल किंवा प्रमुख भूमिका असलेला ‘लय भारी’ हे चित्रपट गाजले. त्याशिवाय ‘व्हेंटिलेटर’ ची निर्मिती प्रियांका चोप्राच्या पर्पल वेबल पिक्‍चर्स प्रॉडक्‍शन हाऊसची. आता याच निर्मिती संस्थेचा दुसरा मराठी चित्रपट ‘काय रे रास्कला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचवेळी जॉन अब्राहमचेही मराठी सिने निर्मितीत पदार्पण झाले आहे. त्यासाठी तो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासदही झाला असून ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित चित्रपट तो करणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत प्रारंभ झाला.

मराठीला आणखी बळ
अभिनेत्री प्रियांका चोप्रा, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि राखी सावंत हे बॉलिवूडचे स्टार्सही महामंडळाचे सभासद आहेत. ज्यांना महामंडळात येऊन सभासद नोंदणीसाठी अडचणी आहेत, अशा स्टार्ससाठी महामंडळाने विशेष समिती स्थापन केली आहे. त्यांच्या घरी जाऊन सभासदत्वासाठी आवश्‍यक बाबी पूर्ण करून तत्काळ सभासदत्व देण्यावर आम्ही भर दिला आहे. कारण ही मंडळी मराठी सिने निर्मितीत उतरली तर मराठी सिनेसृष्टीला आणखी बळ मिळणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.