श्वास रोखायला लावणारा फुटबॉल सामना राहिला बरोबरीत

श्वास रोखायला लावणारा फुटबॉल सामना राहिला बरोबरीत
श्वास रोखायला लावणारा फुटबॉल सामना राहिला बरोबरीत

कोल्हापूर : श्वास रोखायला लावणाऱ्या फुटबॉल सामन्यात दिलबहार तालीम मंडळ (अ) विरूद्ध पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील सामना १-१ ने आज बरोबरीत राहिला.  वेगवान चढाया करत दोन्ही संघांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. उत्तरार्धात पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथे-पाटीलने गोल केल्यानंतर त्याची परतफेड करत दिलबहारच्या  इमॅन्युएलने केली.

अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. श्री नेताजी तरूण मंडळ व कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हतर्फे आयोजित ही स्पर्धा आहे.

बालगोपाल विरुध्दच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने व दिलबहारला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पाटाकडीलविरुद्ध विजय आवश्यक होता. सलग दुसरा सामना खेळावा लागणार असल्याने त्यांच्या शारीरिक क्षमतेचा कसही होता. पाटाकडीलचे खेळाडू जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली पाटाकडीलचा फाॅर्म्यूला ठरला होता.

सामन्यास सुरुवात होताच पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथे-पाटीलने दिलबहारच्या उजव्या गोलक्षेत्रातून मुसंडी मारली. दिलबहारच्या ‌बचावफळीला चकवत त्याने मारलेला फटका  गोलरक्षक आशिष गवळीने अडवला. ओंकार जाधवच्या फ्री किकवर मिळालेल्या पासवरील चेंडूस एकीमने हेड मारली. चेंडू दिलबहारच्या ‌गोलजाळीजवळून गेल्याने दिलबहारच्या ‌खेळाडूंनी सुटकेचा निःश्वास सोडला. लगेचच ओंकारने गोलजाळीसमोरुन फटकावलेला चेंडू दिलबहारच्या खेळाडूने वेळीच रोखला. पाच मिनिटे चेंडू दोन्ही गोलक्षत्रात फिरता ‌राहिल्यानंतर  दिलबहारच्या किरण चौकाशीने पाटाकडीलच्या गोलजाळीकडे मारलेला वेगवान ‌चेंडू तितक्याच चपळतेने गोलरक्षक विशाल नारायणपुरेने हवेत झेप घेत तटवला. या वेळेत दिलबहारच्या खेळाडूंतील पाटाकडीलच्या गोलक्षेत्रातील गोंधळाची स्थिती ‌प्रकर्षाने दिसून आली. कालच्या सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती त्यांना टाळता येत नव्हती. पण, त्यानंतरच्या चढाईत इमॅन्युएलने पाटाकडीलची ‌बचावफळी भेदून मारलेला चेंडू गोलरक्षक विशाल ने तटवून पुढे ढकलला. परतलेल्या चेंडूवर ताबा मिळवून करण चव्हाण-बंदरेने चेंडू निखिल जाधवच्या दिशेने टोलवला. पण, निखिलने चेंडूस दिशाहीन फटका लगावला. इमॅन्युएलने दिलेल्या पासवर करणला नियंत्रण मिळवून फटका मारता आला नाही.

उत्तरार्धात दिलबहारला पहिली कॉर्नर किक मिळाली. त्यावर गोलची संधी दवडली गेली. पाटाकडीलडून ऋषीकेशने चेंडू घेऊन चाल केली. पण, मोक्याच्या क्षणी त्याच्या पायातील चेंडू दिलबहारच्या खेळाडूंनी अलगद काढून घेतला. पाटाकडीलला सलग दोन काॅर्नर किक मिळाल्या. दिशाहीन फटक्यांमुळे त्या फोल ठरल्या. चेंडू घेत पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात शिरकाव करणाऱ्या इमॅन्युएलला धोकादायक रोखल्याने दिलबहारला फ्री किक देण्यात आली. या वेळेत पाटाकडीलच्या ‌खेळाडूंनी चढाया करुनही त्यांनी निव्वळ असमन्वयातून ‌त्या दवडल्या. दिलबहारकडून जावेद जमादार, किरण चौकाशी, इमॅन्युएल, करणने ‌गोलसाठी जंगजंग पछाडले. मात्र, गोल यश आले ते पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथे-पाटीलला. त्याने एकीमच्या पासवर दिलबहारच्या बचावफळीत ‌घुसून ७६ व्या मिनिटाला‌ गोल केला. दिलबहारकडून लगेचच करणला गोलची संधी चालून आली. पाटाकडीलच्या गोलजाळीसमोर पोचण्याची अचूक वेळ त्याला साधता ‌आली नाही. त्याच्या पासवर मात्र इमॅन्युएलने कमाल करत  ८६ व्या मिनिटाला‌ संघाला बरोबरी साधून दिली.

* उत्कृष्ट खेळाडू - अनिकेत तोरस्कर  (दिलबहार), ऋषीकेश मेथे-पाटील (पाटाकडील)
* पाटाकडील              * दिलबहार
- डायरेक्ट किक्स- ६  - डायरेक्ट किक्स -४
- काॅर्नर किक - ७       - काॅर्नर किक-३
- चेंडूवर नियंत्रण-  ६०% - चेंडूवर नियंत्रण-४०%

उद्याचा सामना : बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ), वेळ-दुपारी चार वाजता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com