प्रचार कालावधी कमी झाल्याने उमेदवारांची दमछाक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - मतदानाचा दिवस आठवड्यावर येऊन ठेपला तरी माघारीसाठी अपक्ष दाद देत नसल्याचे चित्र आहे. माघारीची मुदत संपण्यास अद्याप दोन दिवस बाकी असल्याने अपक्षांच्या माघारीसाठी धावपळ सुरूच आहे. अशा परिस्थितीत माघारीनंतर जेमतेम सहा, सात दिवसच प्रचारासाठी मिळत असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. 

कोल्हापूर - मतदानाचा दिवस आठवड्यावर येऊन ठेपला तरी माघारीसाठी अपक्ष दाद देत नसल्याचे चित्र आहे. माघारीची मुदत संपण्यास अद्याप दोन दिवस बाकी असल्याने अपक्षांच्या माघारीसाठी धावपळ सुरूच आहे. अशा परिस्थितीत माघारीनंतर जेमतेम सहा, सात दिवसच प्रचारासाठी मिळत असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यावेळी उमेदवारी जाहीर करण्यापासून सर्वच राजकीय पक्षांना सावधानता बाळगावी लागली. भाजपने निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण केल्यामुळे वातावरण चांगलेच गरम झाले होते. भाजपने दोन्ही कॉंग्रेसमधून फोडलेल्या कार्यकर्त्यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही भाजप दोन्ही कॉंग्रेसमधील नाराजांवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे कॉंग्रेसने आपले उमेदवार जाहीर करण्यात सावधानता बाळगण्यास सुरुवात केली. परिणामी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कॉंग्रेसने आपले उमेदवारच जाहीर केले नाहीत. त्यांना थेट पक्षाचे ए, बी फॉर्म दिले. त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या भावनेने अनेक कार्यकर्त्यांनी अर्ज भरले, पण आता माघार घेण्यासाठी त्यांना शोधण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना माघारीनंतर केवळ सहा ते सातच दिवसच प्रचाराला मिळणार आहेत. एवढ्या कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोचण्याचे आव्हान मतदारांसमोर आहे. 

जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघात दहा ते पंधरा गावे असतात. त्याच्या निम्मी गावे पंचायत समिती मतदारसंघात असतात. शहराला लागून असणाऱ्या मतदारसंघामध्ये फारशी अडचण होत नाही, पण डोंगराळ, दुर्गम भागांतील वाड्या, वस्त्यांमधील मतदारांपर्यंत सहा, सात दिवसांच्या कालावधीत पोचण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे. 

डबा घेऊनच प्रचाराला 
सकाळी बाहेर पडतानाच बहुतांशी उमेदवार आपल्यासोबत डबा घेऊन बाहेर पडत आहेत किंवा ज्या गावात जातील त्या ठिकाणीच एखाद्या कार्यकर्त्याच्या किंवा मतदाराच्या घरीच जेवण करत आहेत. प्रचाराचा कालावधी लक्षात घेऊन नेत्यांनीही उमेदवारांना स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उमेदवार प्रत्येक गावात पोचण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे करत असताना त्यांची प्रचंड दमछाक होत आहे.

Web Title: Candidates tiring due to reduced promotional period