हस्तलिखित विषयातही होते करिअर! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - करिअर केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय अथवा आयटीमध्ये करता येते असे नाही. अगदी हस्तलिखितासारख्या विषयातही ते करता येते. याचा आदर्श प्रियंका मुजूमदार या युवतीने घालनू दिला आहे. शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक मंत्रालयाच्या इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्‌च्या नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्टसाठी सर्व्हेअर म्हणून कार्यरत आहे. 

कोल्हापूर - करिअर केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय अथवा आयटीमध्ये करता येते असे नाही. अगदी हस्तलिखितासारख्या विषयातही ते करता येते. याचा आदर्श प्रियंका मुजूमदार या युवतीने घालनू दिला आहे. शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक मंत्रालयाच्या इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्‌च्या नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्टसाठी सर्व्हेअर म्हणून कार्यरत आहे. 

हस्तलिखितांत ब्राह्मी, बंगाली, मोडी, शारदा यांसारख्या अनेक भारतीय लिपी शिकविल्या जातात. पुरातन काळापासून जपलेली हस्तलिखिते दुर्लक्षामुळे फाटलेल्या व जीर्ण अवस्थेत आहेत. फाटलेल्या हस्तलिखितांचे संदर्भ जोडून, ते दुरुस्त करून त्याचे स्कॅनिंग, डिजिटलायझेशन कसे करायचे, हे हस्तलिखिताच्या अभ्यासक्रमात शिकविले जाते. हे काम करणाऱ्यांना सर्व्हेअर म्हणून ओळखले जाते. प्रियांकाने आजपर्यंत दहा हजारांहून अधिक हस्तलिखितांचे डॉक्‍युमेंटेशन केले आहे. पाचशे वर्षांपूर्वीच्या हस्तलिखिताचा अभ्यास करून त्याचेही संवर्धन केले आहे. या अभ्यासात त्यांना संत ज्ञानेश्‍वरांच्या मोक्षपटाची दोन हस्तलिखितेही मिळाली. दुसरे ज्ञानेश्‍वरांना कोणत्या स्थानावर मोक्षप्राप्ती झाली हे सांगणारे आहे. 

हे हस्तलिखित अत्यंत दुर्मिळ असून, ते केवळ शिवाजी विद्यापीठात उपलब्ध आहे. मोक्षपटाचे हस्तलिखित बडोदामधील सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या हस्तलिखित ग्रंथालय व शिवाजी विद्यापीठात पाहायला मिळते. 

मोक्षपटाबाबत प्रियंका म्हणाली, ""सध्या आपण खेळत असलेल्या सापशिडीचे आद्य रूप हा मोक्षपट आहे. संत ज्ञानेश्‍वर ते सोपानदेव अशी एकूण 130 घरे आहेत. त्यावर श्रीमत्परब्रह्मनिर्गुणसायोज्यमुक्‍तीजननमरणरहितमहाकैवल्यप्रणित असे वाक्‍य लिहिले आहे. खेळाच्या वर्णनावरून उजव्या बाजूला सर्व वरची घरे प्राप्त होऊन मोक्ष कसा मिळेल, तर डाव्या बाजूस पतन कसे होते व माणूस रसातळाला कसा जातो, हे सांगितले आहे. ज्ञानेश्‍वरांना 86 व्या घरात मोक्षप्राप्ती झाल्याचे खेळातून दिसून येते.'' 

- विद्यापीठाच्या ग्रंथालयात दहा हजार हस्तलिखिते 
- नऊ हजार हस्तलिखितांचे डॉक्‍युमेंटेशन 
- देशात 57 हस्तलिखित केंद्रे 
- महाराष्ट्रात पाच केंद्रे 

सध्या माझा विविध मोक्षपटाच्या हस्तलिखितांचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांचे सहकार्य मिळत आहे. 
- प्रियंका मुजूमदार 

Web Title: career in manuscript