"कॅरी अ बॅग, नॉट अ कॅरी बॅग'

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

भाजी मार्केट किंवा किराणा दुकानात खरेदीला गेल्यावर आवश्‍यकता नसतानाही अनेकजण दोन-चार प्लास्टिकच्या कॅरिबॅग घेतात. त्यामुळे कचरा होऊन पर्यावरणाची हानी होत आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटावे, यासाठी आम्ही कागदी पिशव्या बनवून त्या लोकांना वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

- अभिज भानप,

पर्यावरण शिक्षक, बिटला प्रशाला

आम्ही रद्दीमधील कागद पिशवी बनविण्यासाठी वापरतो. अभ्यासासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी करतोय, याचा आम्हाला आनंद आहे. घराघरांमध्ये आणि दुकानांत जाऊन कागदी पिशव्या भेट दिल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकजण यापुढे प्लास्टिकची कॅरिबॅग वापरणार नसल्याचे सांगत आहेत.

- लक्ष्मी सारंगी,

विद्यार्थिनी, इयत्ता आठवी

कागदी पिशव्यांचे वाटप आणि प्रशिक्षणाची मोहीम; बिटला प्रशालेचा उपक्रम

सोलापूर : बाजारात खरेदीला गेल्यावर आपण प्लास्टिकच्या चार-पाच कॅरिबॅग घेतोच. घरी आल्यावर त्या कॅरिबॅग कचऱ्यात टाकून देतो. कळत-नकळत आपल्या हातून पर्यावरणाला घातक ठरणारा कचरा निर्माण होतोय, याचा कोणीच विचार करीत नाही. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत "कॅरी अ बॅग, नॉट अ कॅरी बॅग' ही मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या बनवून त्या परिसरात वाटप करण्यास सुरवात केली आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाचा विचार करण्याची गरज आहे. भविष्याचा अंदाज घेऊन आपल्या रोजच्या जगण्यात पर्यावरणपूरकता आणणे आवश्‍यक आहे. हाच विचार करून विडी घरकुल परिसरातील जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादूल आणि पर्यावरण शिक्षक अभिज भानप यांनी मुलांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. ""कागदापासून बनविलेल्या पिशवीमध्ये एक किलोपर्यंतची वस्तू बसते. कार्डशीटने पिशवी बनविली तर अधिक वजनाची वस्तू बसू शकते. आमच्या शाळेच्या उपक्रमामुळे विडी घरकुल परिसरात पर्यावरणाविषयी जनजागृती होत आहे'', असे मुख्याध्यापिका सादूल यांनी सांगितले.

Web Title: "Carry a Bag, Not Carry A Bag '