बालेकिल्ल्याला खिंडार पडणार?

बालेकिल्ल्याला खिंडार पडणार?

सातारा - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करण्याची घोषणा काल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यापूर्वीही अनेकांनी ऐन निवडणुकीत अशी भाषा वापरली. मात्र, त्याचा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीत झाला नाही. त्यामुळे महसूलमंत्र्यांचे वक्तव्य अतिशयोक्ती वाटते; परंतु सध्याची भाजपची कार्यपद्धती पाहता राष्ट्रवादी व काँग्रेसला हे गांभीर्याने घ्यावे लागणार, हे निश्‍चित.

राष्ट्रवादी व काँग्रेसचे एकेकाळचे बालेकिल्ले असलेल्या कोल्हापूर, सांगलीमध्ये भाजपच्या रणनीतीने नुसते खिंडार पाडले नाही, तर हे दोन्ही गड पूर्णत: उद्‌ध्वस्त केले आहेत. आता स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्याला खिंडार पडेल असे सध्या तरी साताऱ्यातल्या कोणत्याही नेत्याला व नागरिकांनाही वाटत नाही. मात्र, निवडणुकीचा भाजपचा छुपा व उघड कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतरच २०१९ च्या तयारीला सुरवात झाली होती. मागील वेळी इतर पक्षांतून आयात केलेल्या उमेदवारांवरच प्रामुख्याने भाजपची मदार आहे. मात्र, त्या नेत्यांचे त्यांच्या- त्यांच्या पातळीवर काम सुरू आहे; परंतु केवळ त्यांच्यावर पक्ष अवलंबून राहिलेला नाही. विक्रम पावसकर यांच्या माध्यमातून नेत्यांच्या व्यतिरिक्त तालुका, गाव व अगदी बुथ पातळीपर्यंत पक्षाचे संघटन बांधणीचे काम वेगाने करण्यात आले आहे. त्यातही सर्व जाती समूहामध्ये पक्षाचे काम विविध सेल व आघाड्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे सध्या सर्वच जातीमधील जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते पक्षाकडे तयार झाले आहेत. या कार्यकर्त्यांची सर्वसामान्य नागरिकांची प्रशासकीय पातळीवर असलेली साधी-साधी कामे करून देण्यासाठी पक्षीय पातळीवर यंत्रणा उभी राहिली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असो, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची विविध कामे करण्यासाठी भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अडचणीच्या ठिकाणी वरिष्ठांना फोन जोडून कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न होत आहेत. या छुप्या कार्यक्रमाबरोबरच राष्ट्रवादी व काँग्रेसमधील 

नाराजांना भाजपमध्ये घेऊन त्यांना पद, प्रतिष्ठा आणि आर्थिक ताकद देण्याचा सपाटा भाजपने जिल्ह्यात लावला आहे. छुपा अजेंडा फार पुढे पोचल्यानंतर आता जाहीर कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. सध्याची जी आव्हाने दिली जात आहेत, त्यालाही वाढलेल्या ताकदीची जाणीवच कारणीभूत आहे; अन्यथा मागील निवडणुकीत इतर पक्षांना मिळालेल्या मतांच्या आधारे खासदार निवडून आणण्याची भाषा राष्ट्रवादी व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाने करणे हास्यास्पद ठरले असते. निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना कधीही जिल्ह्यात इतर पक्षाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात गावपातळीवरील कार्यक्रम होत नव्हते. ते चित्र भाजपने यंदा नक्कीच बदलले आहे. गावात यांना कोण मिळणार, अशी फुशारकी मारण्याचे दिवस संपलेत, याची जाणीव काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लवकर होईल तेवढे चांगले. भाजपच्या या वाढलेल्या ताकदीची योग्य माहिती व दखल घेत डावाची आखणी केली तरच गड राखण्यात यश येणार आहे; अन्यथा काही मतदारसंघांत नक्कीच खिंडार पडू शकेल, अशी परिस्थिती असल्याचे चित्र भाजपने निर्माण केले आहे.

पाच मतदारसंघांवर लक्ष 
जिल्ह्यात कोणतेही अस्तित्व नसलेल्या भाजपने गेल्या काही वर्षात झालेल्या सर्वच प्रकारच्या निवडणुकांत आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्यातही कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, माण-खटाव, सातारा, कोरेगाव या पाच मतदारसंघांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे सर्व मतदारसंघ तसे एकतर्फी वाटणारेच आहेत; परंतु या मतदारसंघातून फिरायला लागल्यावर माहिती घेतल्यावर भाजपचे काम व जनमतांत होत चाललेले मतपरिवर्तन सहज कानावर येत आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या शब्दांकडे केवळ वल्गना म्हणून पाहिल्यास दोन्ही काँग्रेस अडचणीत येऊ शकतात. यावर मात करण्यासाठी मतदार संपर्काची पारंपरिक पद्धत व गावच्या नेत्याला धरले की होते, ही रित दोन्ही काँग्रेसला बदलावी लागेल, हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com