बालरंगभूमीचे तपस्वी श्रीनिवास शिंदगी यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सांगली : बालरंगभुमीसाठी आयुष्य वाहिलेले श्रीनिवास नारायण शिदंगी (वय 89) यांचे आज निधन झाले. सांगली शिक्षण संस्थेत प्रदिर्घ काळ शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिंदगी सरांनी बालकलारंजन ही संस्था सुमारे अर्धशतकभर सुरु ठेवली. बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत नटवर्य केशवराव दाते यांनी त्यांना बालरंगभूमीचे जनक अशा शब्दात गौरवले होते. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांची प्रकृती बरी नव्हती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले डॉ. विवेक व निलेश, दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. 

सांगली : बालरंगभुमीसाठी आयुष्य वाहिलेले श्रीनिवास नारायण शिदंगी (वय 89) यांचे आज निधन झाले. सांगली शिक्षण संस्थेत प्रदिर्घ काळ शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिंदगी सरांनी बालकलारंजन ही संस्था सुमारे अर्धशतकभर सुरु ठेवली. बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत नटवर्य केशवराव दाते यांनी त्यांना बालरंगभूमीचे जनक अशा शब्दात गौरवले होते. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांची प्रकृती बरी नव्हती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले डॉ. विवेक व निलेश, दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. 

गेल्या सहा दशकांपासून शिंदगी सरांनी सांगलीत बालरंगभूमिची चळवळ कायम ठेवताना शेकडो बालकलाकारांमधील कलागुणांची जोपासणा केली. विष्णूदासांची नाट्यपंढरी सांगली हे बिरुद कायम ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या व्रतस्थ रंगकर्मीमध्ये शिंदगी सरांचे स्थान होते. त्यांनी बाल कलाकारांना अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे देताना हेच पुढे मोठे कलावंत होतील याकडे लक्ष दिले. पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी, यासारखी त्यांची अनेक नाटके राज्यभरात गाजली, सुमारे वीस नाटके त्यांनी मराठी बालरंगभूमीला दिली.याशिवाय कथा, कविता, कविता संग्रह, गीते, नाटके, स्फुट लेखन, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली. आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते सतत लिहते राहिले. बालरंगभूमीवर सतत प्रयोगशिल राहणाऱ्या शिंदगी सरांनी निवृत्तीनंतरही सांगली शिक्षण संस्थेच्या विविध शाळांसाठी बालनाट्ये बसवण्यासाठी योगदान दिले.

संस्थेने त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांबालनाट्यमहोत्सव भरवण्याची परंपरा सुरु केली. मराठी रंग भूमीवर पहिल्यांदा टेप रेकॉर्डच्या सहायाने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी यांनी केला. या महोत्सवात सर मुलातील एक लहान मुल म्हणूनच त्याच उत्साहाने वावरायचे. त्यांचे पुंगीवाला हे नाटक इतक्‍या उच्च अभिरुचीचे होते की ते ख्यातनाम अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केले. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये शिंदगी यांनी लहान मुलांसाठी अभिनय वर्ग सुरु केले. साहित्य, लेखन, अभिनय याबरोबर श्रीनिवास शिंदगी यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारा वतन, वंदे मातरम्‌ हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तयार करून त्याचे शेकडो प्रयोग राज्यभर केले आहेत. हा निधी त्यांनी पुन्हा बालरंगभूमीसाठीच दिला. या कार्यक्रमांच्या ध्वनिफितीही तयार झाल्या. त्याचा उपयोग विविध शाळांमध्ये आजही होत असतो.

लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एक मुंगी नेसली लुंगी, जंगलगाणी, मिठाईचे घर, गणपतीबाप्पा क्रिकेट खेळू या या ध्वनिफितींची त्यांनी निर्मिती केलेली आहे. शिंदगी यांनी भूमिपुत्रांचे वनपूजन हे संगीतमय बालनाट्य लिहिले. या बाल नाट्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड;मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोवा- मुक्ती संग्रामातील क्रांतीकारकांना त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याबरोबरच सुधीर फडके यांच्या गीत रामायणाचा पहिला प्रयोग त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या पांजरपोळ सभागृहात सादर करण्यात आला होता. 

" शिंदगी सरांनी सांगली शिक्षण संस्थेला आपलेच घर मानले. बालकलारंजन संस्था सांगली शिक्षण संस्थेने जपावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार आम्ही गेली पाच वर्षे या संस्थेच्या वतीने बालनाट्यमहोत्सव भरवतो. त्यातून राज्यस्तरावरही मुले सहभागी होतात. सरांच्या स्मृती आम्ही कार्यरुपाने जतन करु.'' 
- नितिन खाडीलकर, अध्यक्ष, सांगली शिक्षण संस्था 

Web Title: children plays guide shriniwas shindagi passed away