नियंत्रण हवेच...वाहनांच्या वेगापेक्षा गतिरोधकांवर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कऱ्हाडच्या रस्त्यांची स्थिती; शंभरहून अधिक गतिरोधकांनी वाहनधारक, नागरिक त्रस्त 

कऱ्हाडच्या रस्त्यांची स्थिती; शंभरहून अधिक गतिरोधकांनी वाहनधारक, नागरिक त्रस्त 
कऱ्हाड - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरातील रस्त्यांना डांबर पडून रस्ते गुळगुळीत झाले खरे. मात्र, ५०० मीटरच्या अंतरात एक, दोन नव्हे तर तब्बल १३ गतिरोधकांनी वाहनधारक हैराण झाले आहेत. गुळगुळीत रस्त्याने वाहनाने वेग घेण्यापेक्षा स्वत: व वाहनाला सावरण्यातच वाहनधारकांची कसरत होत आहे. त्यामुळे पालिकेने गतिरोधक बसवण्यासाठी नेमके कोणते निकष लावले ? गतिरोधकाने त्रस्त झालेल्या नागरिकांसह वाहनधारकांना पूर्वी खराब रस्त्याने मणक्‍याच्या विकाराचा सामना करावा लागत होता. आता मात्र रस्ते गुळगुळीत होवूनही वाहनधारकांचे गतिरोधकांमुळे मणके ढिले होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील सुमारे ५० हून अधिक रस्त्यांच्या कारपेट कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. त्यातील काही रस्त्यांच्या कामाचा कार्यादेश दिला. त्यानुसार रस्ते पूर्णही झाले. निवडणुकीनंतर उर्वरित कामांचे कार्यादेश देण्यात आले. त्यातील काही कामे पूर्णत्वास आली असून काही सुरू आहेत. मात्र, सध्या निवडणुकीपूर्वी व आता झालेल्या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यापूर्वीच्या रस्त्यांवर असणारे गतिरोधक वाट्टेल तिथे टाकले होते. त्यामुळे एका रस्त्यावर किती गतिरोधक असावेत, याचा अंदाज बांधणेही अवघड होते. या गतिरोधकांमुळे नागरिक, वाहनधारक पुरते हैराण झाले होते. मात्र, नव्याने झालेल्या रस्त्यावर ठराविक वर्दळीच्या ठिकाणी वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी गतिरोधक बसवले जाणार असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात पहिले पाढे पंच्चावन्नची स्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा घाट ते चावडी चौकमार्गे दत्त चौक या मुख्य मार्गावर सुमारे १५ गतिरोधक असल्याचे सांगण्यात येते. या मुख्य रस्त्याबरोबरच या रस्त्याला विविध ठिकाणांहून जोडल्या जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही गतिरोधकांची संख्या लक्षणीय आहे. अंतर्गत रस्त्यांमध्ये मंडईतून माजी आमदार (कै.) बाबूराव कोतवाल यांच्या घरापासून रविवार पेठ पाण्याची टाकी, अंडी चौक मार्गे मुख्य पोस्टापर्यंत नवीन व जुन्या गतिरोधकांची संख्या १३ वर पोचली आहे.

त्यामुळे ४०० ते ५०० मीटरमध्ये दहा ते १५ गतिरोधकांमुळे वाहनधारकांना वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यापेक्षा ती कसरत करूनच चालवावी लागत आहेत. जुन्या रस्त्याची दुर्दशा व त्याच्या गतिरोधकांमुळे शहरातील हाडांचे दवाखाने ‘हाउसफुल्ल’ असल्याचे गंमतीने बोलले जायचे. मात्र, आता रस्ता गुळगुळीत होवूनही गतिरोधकांमुळे वाहनधारक, नागरिकांचे मणके ढिले होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालण्यासाठी गतिरोधक बसवण्यापेक्षा गतिरोधकांवरच पालिकेने नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे.

कऱ्हाडचे दवाखाने पुन्हा जोमाने चालणार!
गतिरोधकांमुळे नागरिकांना मणक्‍याचा त्रास होवू लागला आहे. त्यात नवीन रस्त्यावरील गतिरोधकांची संख्या पाहता कऱ्हाडचे दवाखाने पुन्हा जोमाने चालणार असे दिसून येते. पालिकेने याचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या एका माजी पदाधिकाऱ्याने दिली.

Web Title: control on speed & speed breaker