कागलला रूजतेय वड, पिंपळ, उंबराचे बीज

कागलला रूजतेय वड, पिंपळ, उंबराचे बीज

कागल - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये मोठ्या परिश्रमातून वड, पिंपळ व उंबर अशा दीर्घायुषी वृक्षांची लाखो रोपे बियांपासून निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

प्रत्येक वर्षी जून-जुलै महिन्यात वृक्ष लागवडीची धांदल उडालेली असते. यासाठी मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध केली जातात. त्यामुळे रोपांची गरज भागली जाते. रोपे तयार करण्याची प्रक्रिया अवघड आहे. 

रोपे तयार करणारी येथील शासकीय रोपवाटिका म्हणजे रोपनिर्मितीचा मोठा कारखानाच म्हणावा लागेल. रोपांच्या गरजेचा अंदाज घेऊन येथील अधिकारी व कर्मचारी रोपनिर्मितीचा प्रयत्न करतात. 

यंदाच्या (सन २०१७) वृक्ष लागवडीसाठी रोपे पुरविण्यासाठी ही रोपवाटिका सज्ज आहे. तथापि, पुढील वर्षी (जून २०१८)साठी वृक्ष लागवड करता यावी, यासाठी वड, पिंपळ व उंबर या वृक्षांच्या बियांपासून लाखो रोपांची निर्मिती करण्यात येत आहे. या वृक्षांच्या बियांपासून लागणीसाठी रोप तयार होण्याला सुमारे पंधरा ते सोळा महिन्यांचा काळ लागतो. 

या रोपनिर्मितीच्या प्रक्रियेबाबत बोलताना कर्मचारी तानाजी खोत म्हणाले, ‘‘झाडावर फळ पक्व झाल्याशिवाय पक्षी खात नाहीत. अशा खालेल्या फळातील बी पक्ष्यांच्या विष्टेबरोबर (विशिष्ट उष्णतेतून) बाहेर पडते. पक्ष्यांची झाडाखालील ही विष्टा गोळा करायचे काम सर्वप्रथम करावे लागते. यासाठी डिसेंबर महिन्यात मोहीम राबविण्यात येते. गोकुळ शिरगाव ते संकेश्‍वर या महामार्गाच्या परिसरात, तसेच निपाणी-मुरगूड व कागल-सांगाव या रस्त्यांच्या परिसरातून बियांचे संकलन करण्यात आले आहे. संकलित केलेली बी रुजण्यासाठी त्याला आवश्‍यक तापमानाची गरज असते. त्यासाठी या बियांवर चुण्याची निवळी फवारण्यात येते. त्यानंतर ते मिस्ट चेंबरमधील वाळूमध्ये पसरविण्यात येते. त्यावर फॉगरने पाण्याचे हळूवार सिंचन करण्यात येते.  या ठिकाणी बियांची रुजवण सुरू होते. त्यातून पुढे रोपांची उगवण होते. तापमानाची काळजी घेत आवश्‍यक तितकेच पाणी देण्याची काळजी घ्यावी लागते. उगवणीनंतर सुमारे एक ते दीड महिन्यांनी रोपे रूट ट्रेमध्ये लावली जातात. हे रूट ट्रे पॉलिहाऊसमध्ये ठेवण्यात येतात. या वेळी बारीक हातपंपाने दिवसातून चार वेळा त्यावर पाण्याची फवारणी करावी लागते. या ट्रेमध्ये सुमारे ४ ते ६ महिने रोपे वाढतात. त्यानंतर ही रोपे ट्रेमधून प्लास्टिक पिशवीमध्ये लावली जातात. हा रोपनिर्मितीचा अंतिम टप्पा होय. ही पिशव्यातील रोपे ६ ते ७ महिने शेडनेटमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर ऊन सोसण्यासाठी मे महिन्यात ही रोपे शेडनेटमधून बाहेर काढण्यात येतात. जून महिन्यात वृक्षारोपणासाठी त्यांची विक्री करण्यात येते. असा हा सुमारे पंधरा ते सोळा महिन्यांचा काळ या रोपनिर्मितीला लागतो, असे त्यांनी सांगितले. लहान पिशवीतील रोपे उन्हाळ्यात १५ रुपये व वसाळ्यात ७ रुपये, तसेच मोठ्या पिशवीतील रोपांची ४१ रुपयाला विक्री केली जाते.

वड, पिंपळ व उंबर हे वृक्ष दीर्घायुषी आहेत. भारत, चीन व दक्षिणपूर्व आशिया खंडात या वृक्षांना अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. हे तीनही वृक्ष मोठे औषधी आहेत. या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग प्रयत्नशील आहे. 

पुढील हंगामाची तयारी
पुढील वर्षी (जून २०१८) लागण करता यावी, यासाठी येथील रोपवाटिकेत वड, पिंपळ व उंबर या वृक्षांची लाखो रोपे तयार करण्यात येत आहेत. मिस्ट चेंबरमध्ये लाखो रोपांची उगवण होऊन रोपनिर्मितीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. आता ही रोपे रूट ट्रेमध्ये लागण करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com