सांबरशिंग तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

सांबरशिंग तस्करीप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शिंग कोठून आणले? आणि कोणाला विकणार होते? याचा पोलिस तपास करीत आहेत.

सांगली - सांबरशिंग तस्करीप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी दत्तात्रय बापूसाहेब मोटे (वय 42, विश्रामबाग) व सिद्राम बसाप्पा अंगडगिरी (वय 38, पद्माळे फाटा, सांगली) याला अटक केली. दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. 

सांबरशिंगाची तस्करी करणाऱ्या कृष्णा मोहिते (कसबे डिग्रज), अतुल कल्याणी (रूकडी), महेश राव (शिंदे मळा, सांगली), चंद्रकांत कांबळे (नेज) या चौघांना शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सांगलीवाडी येथील यश ढाब्यासमोर ताब्यात घेतले होते. त्यांच्या मोटारीची झडती घेतल्यानंतर सांबरशिंग मिळाले. सदरचे शिंग 4 लाख रुपयाला पुण्यातील एकाला विकणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. चौघांकडून 4 लाखाचे शिंग, 9 लाखांची मोटार, पाच मोबाईल असा 13 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांना अटक करून काल (ता.10) न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी मिळाली. पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज कामटे तपास करत आहेत. 

चौघांची कसून चौकशी केल्यानंतर आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार मोटे व अंगडगिरी याला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. मोटे हा इस्लामपूर तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे, तर अंगडगिरी हा कंत्राटदार आहे. जुने बांधकाम पाडण्याचे तो काम करतो. दोघांना आज न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

सांबरशिंग तस्करीप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शिंग कोठून आणले? आणि कोणाला विकणार होते? याचा पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: crime incident in sangli