रांगा अन्‌ मनस्ताप कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

सांगली - मागणीच्या तुलनेत चलनपुरवठा होत नसल्याने नोटाबंदीच्या निर्णयाला महिना उलटला तरी परिस्थिती गंभीर आहे. एटीएम बंद, बॅंकेच्या दारात रांगा आणि त्यातून होणारा मनस्ताप कायमचा झाला आहे. नागरिक संतप्त झाले असून पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. 

सांगली - मागणीच्या तुलनेत चलनपुरवठा होत नसल्याने नोटाबंदीच्या निर्णयाला महिना उलटला तरी परिस्थिती गंभीर आहे. एटीएम बंद, बॅंकेच्या दारात रांगा आणि त्यातून होणारा मनस्ताप कायमचा झाला आहे. नागरिक संतप्त झाले असून पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. 

पाचशे-हजारच्या जुन्या नोटा रुग्णालयासह अन्य ठिकाणी स्वीकारण्याची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे या जुन्या नोटा घेऊन बॅंकेतच स्वतःच्या खात्यावर भराव्या लागत आहे. तासन्‌तास रांगेत थांबावे लागत आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन सुट्यांनंतर मंगळवारपासून पुन्हा बॅंका गजबजल्या आहेत. पण नागरिकांना रक्कम काढण्यावर मर्यादाच आहेत. बॅंकांना नवीन नोटांचा तुटवडा कायम असल्याने जादा रक्कम दिली जात नाही. शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांत मागणीनुसार नव्या नोटांचा पुरवठा होत नसल्याने आठवड्याला केवळ २४ हजारांपर्यंतच रक्कम काढावी लागत आहे. त्यामुळे चलनकल्लोळ निर्माण झाला आहे. पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. टक्केवारीचा धंदा काहींनी मांडला आहे. शहरातील बहुतांश एटीएम बंद अवस्थेतच आहे. स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेची एटीएम काल सायंकाळी खुली करण्यात आली. मात्र किलोमीटरभर रांगा लागल्या होत्या. तासन्‌तास रांगेत उभारून दोन हजारांची नोट मिळत आहे. पण, ती खपवायची कुठं? हा प्रश्‍न कायम आहे. सुट्ट्या पैशांसाठी नागरिक २ हजारांऐवजी १९०० रुपये काढत असल्याने एटीएममधील १०० च्या नोटा काही तासांत संपत आहेत. रिझर्व्ह बॅंकेतून जास्तीत जास्त पैसे मिळण्यासाठी या भागातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पाठपुरावा केला, मात्र पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 
 

‘कॅशलेस’ला जादा पैसे 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार शहरात डेबिट, क्रेडिटद्वारे व्यवहार सुरू झालेत. मात्र कार्ड स्वाइप केल्यानंतर जादा पैसे जात असल्याने तोही पर्याय नागरिक स्वीकारेनात, अशी गत झाली आहे. स्वाइपद्वारे जादा पैसे आकारले जाणार नाहीत, अशी घोषणा सरकारने केली होती, मात्र पैसे जात असल्याने तेथेही संताप व्यक्त केला जात आहे.