बहुतांश धोकादायक इमारती वादातीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सातारा - पावसाने जीर्ण होऊन गणेश विसर्जन मिरवणुकीदिवशी भवानी पेठेत इमारत कोसळून तीन जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतरही अद्याप लोक शहाणे झालेले नाहीत. साताऱ्यात अशा प्रकारच्या ३०२ इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकी काही इमारती जीवितास हानी पोचवू शकतात, इतकी इमारतींची स्थिती गंभीर आहे. या इमारतींच्या मालकांना पालिकेने नोटिसा बजावल्या असल्या, तरी बहुतांश इमारती वादाच्या भोवऱ्यात आहेत.

पावसाळा आला, की पालिका प्रशासनाला धोकादायक इमारतींची आठवण होते. मग या सर्वांना नोटिसा काढल्या जातात. त्यानंतर पालिकेची जबाबदारी संपते, असा सोईस्कर अर्थ काढला जातो. सप्टेंबर २०१४ मधील दुर्घटनेच्या अनुषंगाने राजपथावर, लांजेकर बिल्डिंगबाबत हाच अनुभव आला. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. दगड- मातीच्या ढिगाऱ्याखाली तिघे गाडले गेले तर एक महिलाही गंभीर जखमी झाली होती. या भीषण दुर्घटनेपूर्वी पालिकेने संबंधित इमारतीवर धोकादायक इमारत म्हणून खबरदारीची नोटीस चिटकवली होती. त्याचा पुढे पाठपुरावा झालाच नाही आणि तिघांना हकनाक जीव गमवावे लागले. 

शहरात आजच्या घडीला ३०२ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातील काही इमारतींमध्ये काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहात आहेत. शनिवार पेठेत भूते बोळ, पूर्वाश्रमीच्या द्रविड मंगलकार्यालयासमोर, शेटे चौक, तसेच सोमवार पेठ या ठिकाणच्या इमारतींना धोका अधिक आहे. भिंतींना पडलेल्या भेगा मोठ्या होत जाणे, बीम वाकणे, वाळवी व पाण्यामुळे इमारतीचे लाकूड खराब होणे आदींकडे दुर्लक्ष धोकादायक ठरते. विविध कारणांमुळे निर्माण होणारा ओलावा इमारतीसाठी अत्यंत धोकादायक असतो. इमारतीतील स्वच्छतागृहालगतच्या भिंतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा निर्माण होतो. सांडपाण्याच्या गळक्‍या पाइपमुळेही ओलावा निर्माण होतो, तेच धोकादायक ठरू शकते.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
पालिकेने धोकादायक ठरविलेल्या बहुतांश इमारती मालक- भाडेकरू अथवा हिस्सेदारांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. मालक इमारतीची दुरुस्ती करत नाहीत. काही भाग उतरवून घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हक्कावरून वाद न्यायालयापर्यंत गेले आहेत. या वादात भविष्यात धोकादायक इमारतीबाबत दुर्घटना घडून त्यातून कोणला इजा झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. 

Web Title: Dangerous Building in Dispute