नऊ वर्षांत 5 बिबट्यांचा मृत्यू 

शिवाजीराव चौगुले
सोमवार, 26 डिसेंबर 2016

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात आज आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत गेल्या नऊ वर्षांत तब्बल पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याचा अधिवास अधिक सुरक्षित करण्याबाबत वन विभागाने गांभीर्याने या गोष्टीकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्नसाखळी मजबूत करतानाच या प्राण्यांवर रोगासह अन्य कारणाने होणाऱ्या आघातांविषयी सखोल अभ्यासाची गरज व्यक्त होत आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील गावांत बिबट्याचा वावर रोजचाच आहे. बिबट्याच्या मुक्‍त संचारामुळे या परिसरातील वाड्यावस्त्यावर लोक रोजच मृत्यूच्या छायेत वावरत आहेत. आज उद्यानापासून 25 किलोमीटर अंतरावर बोरगेवाडी येथे आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. 29 मार्च 2016 रोजी सवादकरवाडी येथे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता.

आठ वर्षांपूर्वी येळापूर परिसरातील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. उद्यानाबाहेर मरणाऱ्या बिबट्यांची संख्या तीन, तर चांदोली उद्यानात सोडण्यासाठी आणले जात असताना मानसिक धक्‍का व हृदयविकाराने दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. 9 वर्षांत पाच बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. 

वन्यप्राण्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न होत असताना असे आकस्मिक मृत्यू चिंता वाढवणारे आहेत. वन्यजीव काय करणार, याकडे लक्ष असेल. या प्राण्यांना उद्यानात पुरसे अन्न मिळते का, याचे निरीक्षण आणि परीक्षण झाले पाहिजे. भक्षशोधासाठी दोन बिबटे आतापर्यंत बाहेर पडले, त्यांचा उपासमारीने मृत्यू ओढवला. मात्र अजूनही काही ठिकाणी बिबट्यांचा वावर या परिसरात असल्याचे लोकांनी पाहिले आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर भागातील शिवरवाडी येथे बिबट्या दिसल्याचे लोकांच्यातून बोलले जात आहे. त्यामुळे यापुढे आणखी उपासमारीने बिबट्याचा बळी जाऊ नये, याची दखल वन्यजीव विभागाने घेणे गरजेचे आहे. 

अन्नसाखळी भक्‍कम आहे? 
चांदोलीत वाघ, बिबटे यांचा वावर आहे. बिबट्यांची संख्या अंदाजे 30 आहे. आता त्यांची गणना केली जात नाही. त्यामुळे नेमकी संख्या किती हे सांगणे शक्‍य नाही. बिबट्यांना अन्नसाखळी मजबूत असणे गरजेचे आहे. त्यांची ही अन्नसाखळी मजबूत करण्यासाठी उद्यानात चितळ व सांबर सोडण्यात आले. तरीही बिबटे बाहेर का पडतात, हा प्रश्‍न आहे. या पुढील काळात अन्नसाखळी मजबूत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.