दंतवैद्यांना मिळणार जनरल प्रॅक्‍टिसची संधी 

शैलेश पेटकर
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

दंत वैद्यकीयचे तीन वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतर हा 'ब्रीज कोर्स' करता येणार आहे. तो प्रमुख्याने तीन वर्षांचा 'एमबीबीएस'चा अभ्यासक्रम असेल. लवकरच याबाबत राष्ट्रीय परिषद बोलवली जाणार आहेत.

सांगली : दंत वैद्यकीयचे शिक्षण पूर्ण झालेल्या वैद्यांना आता जनरल प्रॅक्‍टिसही करण्याची संधी लवकरच मिळणार आहे. त्यासाठी तीन वर्षांचा 'ब्रीज कोर्स' देण्याची प्रक्रिया सुरू असून, सहा महिन्यांत त्यावर निर्णय होईल, अशी माहिती भारतीय दंत परिषदेचे सदस्य डॉ. मानसिंग पवार यांनी आज 'सकाळ'शी बोलताना दिली. 

भारती विद्यापीठाच्या दंत महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्रासाठी ते येथे आले होते. पवार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्‍यातील आहेत. मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणूनही ते कार्यरत आहेत. दंतचिकित्सा क्षेत्रात अनेक अत्याधुनिक यंत्रणा त्यांनी प्रस्तावित केल्या आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारतीय दंत परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पवार म्हणाले, ''दंत वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी नाही; मात्र याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना केवळ दंतचिकित्साविषयीच तज्ज्ञ बनविले जाते; पण अमेरिकेसारख्या महासत्ता देशात दंत वैद्यकीय शिक्षणानंतर जनरल प्रॅक्‍टिसचेही अर्थात एमबीबीएसचेही शिक्षण दिले जाते. जेणेकरून दंतचिकित्सेबरोबरच अन्य जनरल प्रॅक्‍टिसही करता येईल. गेल्या काही वर्षांपासून तेथे चालू आहे. ते यशस्वीही झाले आहे. त्याचा सखोल अभ्यास करून तसाच प्रयोग भारतातही राबवण्याचा आमचा मानस आहे.'' 

पवार म्हणाले, ''दंत वैद्यकीयचे तीन वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतर हा 'ब्रीज कोर्स' करता येणार आहे. तो प्रमुख्याने तीन वर्षांचा 'एमबीबीएस'चा अभ्यासक्रम असेल. लवकरच याबाबत राष्ट्रीय परिषद बोलवली जाणार आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार पूर्ण अभ्यासक्रम ठरवून पुढील शैक्षणिक वर्षापासून हा नवा कोर्स सुरू केला जाईल. त्यात अधिकृत महाविद्यालयांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक महाविद्यालयातील गुणवंत दहा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यानंतर पुढील टप्प्यात प्रवेश मर्यादा वाढवून पंचवीसवर नेली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि दंत वैद्यकीय शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.''

Web Title: Dentist will get permission for General Practice