चित्रपट निर्मात्यांना कऱ्हाड व पाटणची भुरळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

निसर्ग सौंदर्यामुळे चित्रीकरणास पसंती; स्थानिक कलाकारांनाही संधी 
ढेबेवाडी - निसर्ग सौंदर्यामुळे कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांची चित्रपट निर्मात्यांना अक्षरशः भुरळच पडली आहे. चित्रीकरणासाठी जुने वाडे, चाळी आणि प्रसंगानुसार निवडलेल्या ठिकाणी लाइट, ॲक्‍शन, कॅमेरा असे शब्द कानावर पडू लागले आहेत. रूपेरी पडद्यावर दिग्गज कलावंतासोबत झळकण्याची संधी नवोदित स्थानिक कलाकारांनाही मिळत असल्याने येथील तरुणाईही भलतीच खूष आहे.   

पाटण तालुक्‍यातील चित्रपट निर्माते अरुण कचरे यांनी काही वर्षांपूर्वी चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांनाच पहिली पसंती देऊन स्थानिक नवोदित कलाकारांनाही त्यात संधी दिली. त्यानंतर चित्रिकरणाची वर्दळ आता वाढतच निघाली आहे. आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी, तमिळी चित्रपटांसह मालिकांचे चित्रीकरण येथे झाले असून दिग्गज कलाकार यानिमित्ताने हजेरी लावत असल्याने त्यांना बघायला गर्दी वाढत आहे. अनुप जगदाळे, वासू पाटील यांच्यासारखे नव्या पिढीतील अनेक निर्माते, दिग्दर्शकांची चित्रिकरणासाठी कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांनाच पसंती असल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यांचा अपवाद वगळता अन्यवेळी कुठे ना कुठे तरी चित्रिकरण सुरूच असल्याचे दिसते. शहरातील जुन्या चाळी, कॅनॉल परिसर, कुसूर, कोळे, सुर्ली घाटाचा परिसरसह पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी परिसर, दिवशी घाट, डोंगररांगा, निसरे पूल, तेथील मोठा बंधारा आदी भागांना चित्रीकरणासाठी निर्मात्यांची विशेष पसंती आहे. भागातील नवोदित कलाकारांनाही यानिमित्ताने थेट चित्रपटात झळकण्याची संधी मिळत आहे.

चित्रीकरणासाठी दोन्ही तालुक्‍यांतील ‘लोकेशन्स’ इतकी खास आहेत, की प्रसंग उभे करण्यासाठी कृत्रिमता आणावीच लागत नाही. १३ वर्षात आम्ही १५ चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण येथेच केले.      
- वासू पाटील, कला दिग्दर्शक.