अस्सल रंग कोल्हापूरच्या प्रेमाचाच...!

संभाजी गंडमाळे
रविवार, 12 मार्च 2017

कोल्हापूर - खेळताना रंग बाई होळीचा होळीचा...फाटला गं कोना माझ्या चोळीचा...लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या खणखणीत आवाजातलं हे गाणं यंदाच्या होळी आणि धुळवडीच्या निमित्तानंही सर्वांचंच ‘सेलिब्रेशन’ अधिक द्विगुणीत करणार आहे; मात्र यंदाच्या धुळवडीला आणखी एक किनार लाभली आहे, ती म्हणजे धुळवडीच्या दिवशीच म्हणजेच सोमवारी सुलोचना चव्हाण वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार आहेत. 

खरे तर फाल्गुनातल्या पौर्णिमेला ‘होळी’ हा सण तसा साऱ्या देशभरात साजरा होतो. होलिका, हुताशनी आणि होलित्सव अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा लोकोत्सवच. होळीचेच दिवस होते आणि प्रसिद्ध कवी यादवराव रोकडे एका अल्बमच्या कामासाठी संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या घरी आले होते. शिंदे यांच्या अंगणात लहान मुले रंग खेळत होती.

त्यातल्याच एका लहान मुलीची चोळी या खेळात किंचितशी उसवली आणि त्याकडे यादवरावांचे लक्ष गेले. त्यांना लगेच कल्पना सुचली आणि त्या लहान मुलीच्या जागी एखादी मोठी महिला असती तर असा विचार मनात येताच त्यांना लगेचच लावणीचा मुखडा सुचला. तो ‘खेळताना रंग बाई होळीचा...’ हा शिंदे यांना तो मुखडा वाचतानाच त्याला चालही सुचली आणि सुलोचना चव्हाण यांच्या ठसकेबाज आवाजात साऱ्या महाराष्ट्राला एका शृंगारिक लावणीची भेट मिळाली. या लावणीच्या ‘मेकिंग’ची ही कथा आजही अनेकांना अचंबित करते. किंबहुना प्रत्येक होळीच्या सणाला या लावणीचा ठेका सारा महाराष्ट्र आजही धरतो. या साऱ्या आठवणींना सुलोचना चव्हाण आजही उजाळा देतात. 

‘सकाळ’शी संवाद साधताना त्या भरभरून बोलतात. या वयातही त्यांचा आवाज तितकाच खमका आणि खणखणीत. माझ्या गावाकडचा फोन आला, की मन कसं प्रफुल्लित होतं, असं आवर्जुन सांगताना रसिक मायबाप प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ‘‘वाढदिवस काय हो, माझं सारं आयुष्यच तुम्ही दिलेल्या प्रेमामुळं अधिक आनंदी झालं. आणखी दुसरं काय पाहिजे? ज्या माणसाला दोन वेळचं पोटभर खायला मिळतं, त्यासारखं दुसरं सुख ते काय असतं?’’

महाराष्ट्रानं आणि त्यातही कोल्हापूरनं नेहमीच उदंड प्रेम दिलं. एक गोष्ट मात्र नक्की आहे. कितीही मोठे व्हा, प्रसिद्धी मिळवा; पण त्याला गर्वाचा तसूभरही स्पर्श होऊ देऊ नका.
- सुलोचना चव्हाण. 

Web Title: dhulwad celebration