क्रूरकर्मा डॉ. खिद्रापुरे पोलिसांना शरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सांगली - भ्रूणहत्या करणारा म्हैसाळ (ता. मिरज) येथील क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे आज पहाटे मिरज ग्रामीण पोलिसांना शरण आला. त्याला अटक करून मिरजेतील न्यायालयात हजर केल्यानंतर दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, म्हैसाळ येथे या प्रकरणाच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन या सर्व प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. 

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती प्रवीण जमदाडे (वय 26) यांचा बेकायदा गर्भपात करताना खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. मृत स्वातीचे आई-वडील आणि नातेवाइकांनी पाठपुरावा केल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी खिद्रापुरे आणि स्वातीचा पती प्रवीण जमदाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर खिद्रापुरे फरारी झाला. मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक आणि हादरवून टाकणाऱ्या गोष्टी पुढे आल्या. खिद्रापुरेने म्हैसाळ येथे भ्रूणहत्येसाठीच हॉस्पिटल सुरू केल्याची माहिती पुढे आली. पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने म्हैसाळ येथील ओढ्याजवळ खोदकाम केल्यानंतर प्लॅस्टिक बॅगांमधून टाकलेले 19 भ्रूण मिळाले. त्यापैकी काही भ्रूण कुजलेले होते. काही बॅगांमध्ये मांसाचे गोळे, हाडे मिळाली. सर्व भ्रूण ताब्यात घेऊन मिरज वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी ठेवले आहेत. डीएनए चाचणीसाठी संबंधित भ्रूण न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले जातील. 

बेळगावात सापडल्याची चर्चा 
दरम्यान, डॉ. खिद्रापुरे याला पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके मागावर होती. दोन दिवस पोलिसांना चकवा देणारा खिद्रापुरे बेळगाव येथे सापडल्याची चर्चा रंगली होती; परंतु आज पहाटेच्या सुमारास तो मिरज ग्रामीण पोलिसांना शरण आला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलिसांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी मागितली. त्याप्रमाणे खिद्रापुरेला दहा दिवस पोलिस कोठडी दिली. भ्रूणहत्येचे प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलिसांचे संयुक्त पथक याचा तपास करत आहे.

Web Title: Dr. khidrapure surrender