वीज ग्राहकांना मिळणार मोबाईलवर बिल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

सोलापूर - राज्य विद्युत वितरण महामंडळामध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरून घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय करण्यात आली आहे. आता महावितरणच्या ग्राहकांची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येत असून, त्यांना घरबसल्या वीजबिल मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी "सकाळ'ला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान दिली.

राज्यभरातील दोन कोटी वीज ग्राहकांचे पत्ते, मोबाईल क्रमांक यासह अन्य माहिती गोळा करण्यात येत असून, आगामी काही महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर ग्राहकांना वेळेवर त्यांच्या घरी अथवा मोबाईलवर बिलाची रक्‍कम समजेल. त्यामुळे वीजबिलाची वाट पाहत न बसता ग्राहकांना तत्काळ ऑनलाइन बिल भरता येणार आहे. वीजचोरी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, नादुरुस्त मीटर आणि परंपरागत मीटर आता पूर्णपणे बदलण्यात येत असल्याचेही इरवाडकर यांनी सांगितले.

महावितरणचा तंत्रज्ञान विभाग आता विकसित होत असून, मोबाईलद्वारे पारदर्शक मीटर रीडिंग घेतले जात आहे. त्यासाठी स्वतंत्र ऍप तयार करण्यात आले असून, ग्राहकही त्याद्वारे रीडिंगचा फोटो ऑनलाइन महावितरणला पाठवू शकतात. ज्यादा रीडिंग दाखविले जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने हे ऍप तयार केल्याचे इरवाडकर यांनी सांगितले.

Web Title: electricity bill on mobile