'एनटीपीसी'मधून शुक्रवारपासून वीजनिर्मिती सुरू - राय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

रोज 660 मेगावॉट निर्मिती; 50 टक्के वीज महाराष्ट्राला
सोलापूर - फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील "एनटीपीसी' प्रकल्प येत्या शुक्रवार (ता. 31) पासून सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक एन. एन. राय यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

"एनटीपीसी'ची दोन केंद्रे सोलापूर येथे होणार आहेत. त्याबाबत माहिती देताना राय म्हणाले, ""यातील पहिल्या केंद्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. हे 660 मेगावॉट क्षमतेचे असलेले केंद्र येत्या शुक्रवारपासून चालू होईल. त्यानंतर दुसरे 660 मेगावॉटचे केंद्र पुढील वर्षभरात कार्यान्वित होईल. येथे तयार होणारी जवळपास 50 टक्के वीज ही महाराष्ट्राला मिळणार असून, उर्वरित 50 टक्के वीज इतर राज्यांना दिली जाणार आहे.''

'एनटीपीसी' प्रकल्पामुळे तापमानामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. तापमान संतुलित राहावे यासाठी "एनटीपीसी'ने 126 एकरामध्ये एक लाख 32 हजार झाले लावली आहेत. तसेच शासनाच्या वनविभागाच्या सहकार्याने दरवर्षी 50 हजार झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. प्रकल्पातील धूर वातावरणामध्ये मिसळू नये, यासाठी चिमणीची उंची 275 मीटर इतकी करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही,'' असा दावाही राय यांनी केला.

सांडपाणी घेण्यास तयार
महापालिकेकडून प्रक्रिया केलेले सांडपाणी घेण्याची आमची तयारी आहे. याबाबतचा करार प्रगतिपथावर आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी घेणे 30 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रकल्पाला बंधनकारक असल्याचा नियमही केला जात आहे. एनटीपीसी प्रकल्पात पाण्याचा एकही थेंब वाया जात नाही. सर्व पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरले जाते. भविष्यात प्रकल्पाची सुरक्षा वाढविणार असल्याचेही एन. एन. राय यांनी सांगितले.