अन्.. चक्क 'बोकडावर' केले अंत्यसंस्कार !

हरिभाऊ दिघे
शनिवार, 22 जुलै 2017

तळेगाव दिघे(जि. नगर) : एरवी देवाला सोडलेले बोकड विकले अथवा कापले जातात. मात्र संगमनेर तालुक्यातील करूले येथे गहिनीनाथ महाराज देवाला सोडलेल्या बोकडाचा अकाली मृत्यू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करीत प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील करुले गावातील ज्ञानदेव आहेर यांनी ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी चार वर्षाचा असताना बोकड देवाला सोडला होता, मात्र विषबाधा झाल्याने बोकड बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातून अचानक फेस येत असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब आहेर यांनी पाहिले. त्यानंतर त्यांचे बंधू सोमनाथ आहेर यांनी तात्काळ पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. थोरात यांना बोलविले. मात्र डॉक्टर येईपर्यंत बोकडाची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर अण्णासाहेब आहेर, सोमनाथ आहेर, कादरभाई पठाण, किशोर बर्डे व गणेश मोरे या तरुणांनी एकत्र येत बोकडाचा दफनविधी केला. ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ खडडा खोदून अंत्यविधी करून प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. या बोकडाचा ग्रामस्थांना चांगलाच लळा लागला होता. आता त्याच्या मृत्यूने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.