संगमनेर : 'महावितरण' विरुध्द काँग्रेसचा रास्तारोको 

sangamner congress protest
sangamner congress protest

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : कोणतीही पूर्वसुचना न देता अचानक वीज रोहित्रे बंद केल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरुध्द शनिवारी सकाळी कोल्हार - घोटी महामार्गावर वडगावपान फाटा ( ता. संगमनेर ) येथे दोन तास रास्तारोको आंदोलन छेडले.

संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडगावफाटा येथे छेडण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलन प्रसंगी थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे, राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, लक्ष्मण कुटे, शिवाजी थोरात, भाऊसाहेब कुटे, सुरेश थोरात, संपतराव गोडगे सतिष कानवडे, पांडूरंग घुले, साहेबराव गडाख, प्रभाकर कांदळकर, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, बेबी थोरात, पद्मा थोरात, मिलींद कानवडे उपस्थित होते.

वडगावपान फाट्यावर दोन तास झालेल्या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुध्द आक्रमक झाले होते. मनमानी करणाऱ्या अधिकार्‍यांनी माफी मागावी अशी मागणी संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केली. त्यामुळे शेतकर्‍यांना आवरतांना प्रशासनाची तारांबळ उडाली.

अ‍ॅड. माधव कानवडे म्हणाले, शेतकर्‍यांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकरी एकवटले आहे. या आंदोलनाची मुंबई मधील सरकारला दखल घ्यावीच लागेल. सध्याचे भाजपा सरकार हे नियोजन शुन्य सरकार आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. मात्र त्याला जाणीवपूर्वक उपाशी ठेवले जात आहे. कर्जमाफीने सर्वांना फसविले. शेती मालाला भाव नाही. एकीकडे कारखानदार, उद्योगपती यांना हजारो कोटींचे अनुदान देत आहे. सर्वांना अन्नधान्य पुरविणार्‍या शेतकर्‍याला का नाही ? हिरवाई निर्माण करतो म्हणून जपानमध्ये शेतकर्‍यांना मोठी मदत करतात. शासनकर्ते हो, तुम्हाला स्वच्छ हवा व ऑक्सीजन पुरविणारा हाच शेतकरी आहे. त्याला संपूर्ण वीज बिल माफी झालीच पाहिजे.
 रणजितसिंह देशमुख म्हणाले, संगमनेर तालुका हा चळवळीचा तालुका आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या तालुक्याला अन्यायाविरुध्द लढण्याची शिकवण दिली आहे. प्रत्येक शेतकरी आंदोलनाची सुरुवात संगमनेरमधून झाली आहे. सध्याच्या सरकारने शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडून बाहेरुन शेतीमाल आयात केला आहे. अतिशय गोंधळलेले आणि निर्ढावलेले सध्याचे शासन आहे. ग्रामीण भागाची कोणतीही जाण नसलेले या सरकारने तातडीने विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा उद्या तालुक्यातील सर्व सबस्टेशनचा शेतकरी ताबा घेतील असा इशारा त्यांनी दिला.

बाबा ओहोळ म्हणाले, सध्याचे सरकार हे शेतकर्‍यांसाठी मोठे सुलतानी संकट आहे. सरकारमध्ये एकही शेतकरी नेता नाही. काँग्रेस सरकार काळात आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्‍यांचे नेतृत्व करतांना कर्जमाफी मिळवून देत वेळोवेळी अनुदाने दिली. मात्र या सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक करत सातत्याने चेष्टा चालविली आहे. अचानक विज पुरवठा बंद करणे मोठे अन्यायकारक आहे. खरेतर सर्व विज वितरण कंपनीच्या कारभाराची सीआयडी चौकशी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
 प्रसंगी भाऊसाहेब कुटे, थोरात, संपतराव गोडगे, निर्मला गुंजाळ, सतिष कानवडे, सुरेश थोरात, विलास कवडे, पद्मा थोरात, अर्चना बालोडे, बेबी थोरात, प्रभाकर कांदळकर, शिवाजी जगताप, अवधूत आहेर यांची भाषणे झाली.

आंदोलनात आर. बी. सोनवणे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, रमेश नेहे, सचिन दिघे, सोपान जोंधळे, अनिल कांदळकर, अशोक थोरात, बाळासाहेब गायकवाड, गंगाधर जायभाये, तात्याराम कुटे, नानासाहेब शिंदे, बी. व्ही. दिघे, संजय थोरात, प्रभाकर बेंद्रे, विलास शिंदे, राजेंद्र चकोर, सोमनाथ सोनवणे, बाबासाहेब शिंदे, रोहिदास पवार, ज्ञानदेव थोरात, गणपत खेमनर, बाबासाहेब गायकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. बी. गोसावी यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारुन शेतकर्‍यांच्या तीव्र भावना वरिष्ठ पातळीवर पोहचून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर सकाळी दहा वाजता सुरु करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन बारा वाजता मागे घेण्यात आले.

माणूसकी धर्म जोपासला !
रास्तारोको आंदोलन सुरु असताना अचानक आलेल्या रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी त्वरीत वाट मोकळी करुन देत संवेदनशीलता व माणूसकीचा धर्म जोपासला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com