नीट नियोजन केल्यास उन्हाळ्यातही पुरेसे पाणी

रजनीश जोशी 
बुधवार, 12 एप्रिल 2017

सोलापूर - योग्य नियोजन केल्यास एप्रिल आणि मे महिन्यात सिंचन आणि पिण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. उजनी धरण, औज बंधाऱ्यासह जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांमध्ये उन्हाळ्यात टंचाई नाही. तथापि, ज्या गावांतील जलस्रोत आटले असतील, तिथे टॅंकरची सुविधा आवश्‍यक आहे.

सोलापूर - योग्य नियोजन केल्यास एप्रिल आणि मे महिन्यात सिंचन आणि पिण्यासाठी जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. उजनी धरण, औज बंधाऱ्यासह जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांमध्ये उन्हाळ्यात टंचाई नाही. तथापि, ज्या गावांतील जलस्रोत आटले असतील, तिथे टॅंकरची सुविधा आवश्‍यक आहे.

उजनी धरणातून सिंचनासाठीची उन्हाळी हंगामातील पाळी देण्याची तयारी सुरू आहे. १७ मार्च रोजी सोलापूरसाठी धरणातून सोडलेले पाणी पोचल्याने बंधाऱ्यात पुरेसे पाणी आहे. पूर्वीच्या अनुभवानुसार हे पाणी ६२ ते ६५ दिवस पुरते. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचीही टंचाई कमी झाली आहे. भीमा नदीकाठच्या कर्नाटक भागातील शेतकऱ्यांनी नदीतील पाणी उपसा प्रचंड प्रमाणात सुरू केला आहे. बंधारा फोडण्याचा, दारं उपसण्याचे प्रकार झाले आहेत. अशा प्रकारे पाण्याची चोरी झाली तर पाणी टिकणे अवघड आहे.

भूजल साठण्याची प्रदीर्घ प्रक्रिया
पाऊस चांगला झाला म्हणजे जमिनीतील पाणी वाढते, असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात जमिनीत पाणी साठण्याची प्रक्रिया खूप संथ असते. आम्ही केलेल्या प्रयोगानुसार त्याचे मापनही करण्यात आले आहे. ते असे ः नदी प्रवाहातून जमिनीवरून वाहणारे पाणी प्रत्येक सेकंदाला सात फूट जात असते. साठवलेल्या तलावातील पाणी दर सेकंदाला ०.७ फूट इतके मुरत असते. जमिनीवर पडलेले पाणी जमिनीतील वाळू, खडक, मुरूम अशा थरातून मुरत जाते, त्याचा वेग मात्र प्रत्येक दिवसाला ०.३३ फूट इतका संथ असतो. त्यामुळे जमिनीतील पाणी कूपनलिका किंवा विहिरींमधून उपसा करताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. पिकाची निवड त्यासाठी पाण्याची उपलब्धता पाहूनच करावी लागते. आज विहिरीतून किंवा कूपनलिकांमधून आपण उपसत असलेले पाणी तीन पिढ्यांपूर्वीचे आहे, याचे भान ठेवावे, असा इशारा ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ, माजी प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी दिला आहे.

चिंचपूर बंधारा फोडल्याने पाण्याच्या नियोजनात गडबड होऊ शकते. मात्र, आवश्‍यकता भासल्यास २० मे नंतर सोलापूरला पिण्यासाठी पाणी देता येणे शक्‍य आहे.
- शिवाजी चौगुले, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा केल्यास सोलापूरकरांना पिण्याचे पाणी निश्‍चितपणे पुरेल. तापमान ४२ पेक्षा जास्त राहिल्यास जलसाठा झपाट्याने कमी होईल, हेही तितकेच खरे.
- संजय धनशेट्टी, उपअभियंता, महापालिका पाणीपुरवठा विभाग

पाणी उपसा आणि पाणी मुरण्याची प्रक्रिया यांचे संतुलन राखण्याची गरज आहे. तथापि, सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतातच ते बिघडल्याने त्याचा भूजलावर मोठा परिणाम झाला आहे.
- डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, माजी प्राचार्य आणि भूजलतज्ज्ञ

Web Title: f properly planning the summer, the water