कर्जमुक्तीसाठी एक जूनपासून शेतकऱ्यांचा संप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

शिर्डी - कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून संपावर जातील, असा निर्णय आज पुणतांबे (ता. राहाता) येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. मराठवाड्यातील चाळीस गावांतील शेतकऱ्यांना या संपात सहभागी करून घेण्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेण्याचा, पोटापुरतीच शेती पिकविण्याचा आणि संपाचे लोण राज्यभर पसरविण्याचा निर्धार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंत्ययात्रेचा प्रतीकात्मक देखावा ग्रामसभेत सादर करण्यात आला. 

शेतकरी व त्यांच्या कुटुंबांतील महिला, महाविद्यालयीन तरुण-तरुणांनी या ग्रामसभेत सहभागी होऊन शेतीच्या बिघडलेल्या अर्थकारणाचे वास्तव जळजळीत शब्दांत मांडले. "भीक नको, हवे कामाचे दाम', "कर्जात जन्माला आलो, कर्जात मरणार नाही,' "शेतमालाचे भाव पाडण्याचे षड्‌यंत्र' आदी मुद्द्यांवर शेतकरी संघटनेचे जनक (कै.) शरद जोशी यांच्या सिद्धांतांवर या सभेत चर्चा झाली. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले. अनिल घनवट, सीमा नरोडे, विठ्ठल शेळके, रूपेश काले आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. पुणतांब्याच्या सरपंच छाया जोगदंड यांनी ठरावाचे वाचन केले. उपस्थित शेतकऱ्यांनी हात वर करून त्याला मंजुरी दिली. 

धनंजय जाधव, धनंजय धोर्डे, डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, सर्जेराव जाधव, अभय चव्हाण, विठ्ठल शेळके, रूपेश काले, बाळासाहेब भोरकडे, विजय धनवटे, अशोक बोरबणे पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र आले. त्यांनी गोदाकाठच्या मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील चाळीस गावांमध्ये कर्जमाफीच्या प्रश्‍नावर जनजागृती सुरू केली आहे. या सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेऊन, कर्जमुक्तीबरोबरच स्वामिनाथन आयोग लागू करावा, दुधाला पन्नास रुपये लिटर भाव द्यावा, मोफत व पुरेशी वीज, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान, शेतकऱ्यांसाठी पेन्शन आदी प्रमुख मागण्यांचे ठराव केले जात आहेत. "येत्या एक जूनपासून पोटापुरतीच शेती पिकवा, खुशाल संपावर जा,' असे आवाहन या सभांमधून केले जात आहे. त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आज सांगण्यात आले.