चित्रनगरीत लवकरच "लाइट-कॅमेरा-ऍक्‍शन' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

कोल्हापूर - अनेक वर्षे वनवास भोगत असलेल्या येथील चित्रनगरीचे रुपडे आता पालटले आहे. 12 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली असून, दुसऱ्या टप्प्यासाठी 16 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या लोकेशन्सच्या डागडुजीसह पोलिस स्टेशन, कोर्टाची इमारत अशी पाच ते सहा नवीन लोकेशन्स तयार झाली आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत चित्रनगरीत प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे. चित्रीकरणाला मिळणारा प्रतिसाद पाहून लगेचच पुढील टप्प्यातील कामांनाही त्याच वेळी प्रारंभ होणार आहे. 

चित्रनगरीच्या पायाभूत सुविधांसाठी मार्च 2016 मध्ये तीन कोटी 49 लाखांची निविदा प्रसिद्ध झाली. त्यातून पाटलाचा वाडा, स्टुडिओचे विस्तारीकरण, सुरक्षा रक्षक केबिन आदी सुविधा उपलब्ध झाल्या. त्याशिवाय नवीन डोमहाऊस व इतर कामांसाठी नऊ लाख 61 हजार, स्ट्रक्‍चरल रिपेअरिंग व इतर कामांसाठी 49 लाख 44 हजार, नवीन गार्डन लोकेशन्ससाठी 33 लाख 72 हजार, अंतर्गत प्रवेशद्वारासाठी सात लाख 66 हजार, वातानुकूलन यंत्रणा व इतर कामांसाठी 48 लाख 17 हजार, जिम्नॅशियम बिल्डिंगसह चेंजिंग रूम, टॉयलेट सुविधांसाठी 31 लाख तीन हजार, फायर फायटिंग सिस्टीमसाठी 34 लाख दहा हजार, कंपाउंड वॉलसाठी चार लाख 99 हजार अशा विविध निविदा प्रसिद्ध झाल्या. काही निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने फेरनिविदा काढल्या. अनेक अडचणींचा सामना करून अखेर पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. चार किलोमीटरचे अंतर्गत रस्तेही पूर्ण झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आता स्ट्रीट लाइट उभारण्याचे काम सुरू होणार आहे. 

दरम्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध कला संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आज चित्रनगरीला भेट देऊन पाहणी केली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, माजी कार्यवाह भालचंद्र कुलकर्णी, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, अभिनेता आनंद काळे, स्वप्नील राजशेखर, संजय मोहिते, शरद चव्हाण, बाळा जाधव, अरुण भोसले, सुरेंद्र पन्हाळकर, सुरेखा शहा, बबिता काकडे, शोभा शिराळकर, छाया सांगावकर, विजय शिंदे, दिलीप भांदिगरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

सूचनांचा व्हावा विचार 
चित्रनगरीचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील काम करताना स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांच्या सूचनांचा विचार होणे आवश्‍यक आहे. एकदा काम पूर्ण झाले की राहिलेल्या त्रुटी लवकर पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे अशा सूचनांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा या वेळी भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, अभिनेता आनंद काळे, स्वप्नील राजशेखर यांनीही झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना विविध सूचना मांडल्या. 

5 जूनला वृक्षारोपण 
चित्रनगरी परिसरात वृक्षारोपणासाठी गेल्या जुलैमध्ये निविदा निघाली. मात्र, त्याला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता हे काम सुरू होणार असून, खड्डे काढून दोन हजार झाडे लावली जाणार आहेत. खड्डे आणि इतर आवश्‍यक गोष्टींची पूर्तता मेअखेर करून 5 जूनला वृक्षारोपण केले जाईल. 

Web Title: Film city soon lights-camera-action