अखेर मेडिकल कॉलेजला मिळाली जागा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सातारा - साताऱ्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन कायमस्वरूपी विनाअट व विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस खरा केला. याप्रश्‍नी "सकाळ'ने मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

सातारा - साताऱ्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन कायमस्वरूपी विनाअट व विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस खरा केला. याप्रश्‍नी "सकाळ'ने मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

सातारा जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. मात्र, ते कोठे उभारायचे, यावरून बराच वादविवाद झाला. मागील सरकारच्या काळात जिल्ह्यातील मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री असतानाही जागेचा प्रश्‍न प्रलंबित राहिला. सात वर्षे लोटली तरी या कॉलेजला जागा देण्याचा निर्णय झाला नाही. युती सरकारच्या काळातही त्याला गती मिळत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात आले, त्यादिवशी "मुख्यमंत्रीसाहेब, मेडिकल कॉलेजचे तेवढं बघा!' या आशयाखाली बातमी "सकाळ'ने मे 2017 मध्ये प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 18 मे 2017 रोजी महिनाभरात मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न सोडविणार, असे आश्‍वासन दिले. मात्र, त्यानंतर वेगाने पावले उचलली गेली नाहीत. 

याच दरम्यान 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर आले. तेव्हा "सकाळ'ने पुन्हा एकदा "फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा?' या आशयाखाली मेडिकल कॉलेजबाबतच्या लोकभावना मांडल्या. शिवाय, "सकाळ'च्या प्रतिनिधींनी व्यक्‍तिगतरीत्या मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मांडला. त्यावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात "लवकरच त्यास मान्यता देऊ', अशी ग्वाही दिली. 

अखेरीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयास 25 एकर जागा कायमस्वरूपी देण्याचा निर्णय झाला. 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू होणार आहे. संबंधित जागा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर केली जाईल, तसेच इंडियन मेडिकल कौन्सिलची परवानगी नव्याने घ्यावी लागणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कामकाज सुरू होणे अपेक्षित आहे. 

दरम्यान, भाजपचे दीपक पवार, धनंजय जांभळे, विजय काटवटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोवई नाक्‍यावर साखर वाटप करून या निर्णयावर आनंद व्यक्त केला. 

मुख्यमंत्र्यांचे ट्‌विट... 
* सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर कायमस्वरूपी जागा. 
* महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा देणार. 
* गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार. 
* गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी.

Web Title: Finally the medical college got a place sakal news impact