अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाच्या सेटला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : भावेनगर( ता. कोरेगाव) येथे श्री घुमाई देवी मंदिराच्या पूर्वेला अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या सेटला काल (ता. 24) दुपारी चार वाजता मोठी आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : भावेनगर( ता. कोरेगाव) येथे श्री घुमाई देवी मंदिराच्या पूर्वेला अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या सेटला काल (ता. 24) दुपारी चार वाजता मोठी आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

चित्रपटासाठी ब्रिटिशकालीन जेलचा सेट उभारण्यात आला होता. हा तुरुंग युध्दात स्फोटने उडवून देण्यात आल्याचा सीन या चित्रपटात आहे. आज या सीनचे शूटींग होते. त्याकरिता सेटचा काही भाग आज दुपारी स्फोटाने उडवण्यात आला. मात्र ऊन व वाऱ्यामुळे काही भाग जाळण्याच्या नादात संपूर्ण सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने आज अक्षयकुमारचे शूटींग नव्हते. त्यामुळे तो याठिकाणी आला नव्हता. मात्र या आगीत कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

सायंकाळी सात वाजता फलटण नगरपालिका व शरयु साखर कारखाना यांचे अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पूर्ण सेट बेचिराख झाला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे, वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनंत चिंचकर व कर्मचारी यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान ही आगीची माहिती पिंपोडे गावात समजल्यावर पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुखे यांनी कार्यकर्त्यासह याठिकाणी धाव घेतली. याठिकाणी मुबलक पाणी नसल्याने चित्रपट व्यवस्थापनाला आग आटोक्यात आली नाही. अग्नीशामक बंब आल्यावर रात्री आठ वाजता ही आग विझवण्यात यश आले. तोपर्यंत हा भव्य सेट जळून खाक झाला.

गार्डची अरेरावी- घटनास्थळी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना गार्डनी घुमाई देवी मंदिरासमोर रोखले व वार्तांकन करण्यास मज्जाव केला. तसेच मदतीला गेलेल्या ग्रामस्थांनाही हटकले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे चित्रपट व्यवस्थापनाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुमारे दोन महिन्यांपासून हे चित्रीकरण सुरू आहे. मात्र गार्डच्या अरेरावीला स्थानिक ग्रामस्थ वैतागले आहेत. 

Web Title: fire at set of movie kesari acting by akshay kumar