अबाहु दिव्यांगासाठी दुचाकीची निर्मिती!

अबाहु दिव्यांगासाठी दुचाकीची निर्मिती!

कऱ्हाड - जगात अशक्‍य असे शक्‍य काहीच नाही, अशी मराठीतील म्हण खरी करून दाखवण्याचे काम येथील शासकीय अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील पाच विद्यार्थिनींनी केले आहे. दोन्ही हात नसलेली दिव्यांग व्यक्ती मोटारसायकल चालवू शकते, असे कोणी म्हटले तर त्यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही. मात्र, या पाच विद्यार्थिर्नींनी ते शक्‍य करून दाखवले आहे. महाविद्यालयातीलच दिव्यांग विद्यार्थ्याला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेला संशोधन प्रकल्प कौतुकाचा विषय बनला आहे. त्यांच्या अभ्यास व संशोधनातून तयार झालेली अनोखी मोटारसायकल दोन्ही हात नसणारी व्यक्ती चालवते, तेव्हा त्याकडे पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. 

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखांमधील अंतिम वर्षामधील विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करावा लागतो. संशोधनवृत्तीने काम करून ता प्रकल्प साकारावा लागतो. त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला व संशोधनाला वाव मिळतो. यावर्षी यंत्र अभियांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षातील अमृता देसाई, पूजा जाधव, सायली पवार, स्वप्नाली सुतार व प्रगती पाटील यांनी प्रकल्प साकारताना मोठे आव्हान स्वीकारले. महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान शाखेतील राधेय पल्ली या दिव्यांग विद्यार्थ्याकडे पाहून त्यांच्या प्रकल्पाला चालना मिळाली. त्यातून त्यांचा ‘डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट ऑफ व्हिलर डीआ फॉर हॅम्पर’ हा प्रकल्प तयार झाला. महाविद्यालयातील दोन्ही हात नसलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहून त्यांनी त्यालाही सामान्यांप्रमाणे  मोटारसायकलवरून इकडे-तिकडे जाताना कोणत्याही वाहनांची वाट पाहण्यापेक्षा स्वत: वाहन घेऊन वावरता यावे, या उद्देशाने हा प्रकल्प केला. त्यासाठी त्यांनी जुनी कायनेटिक होंडा मोटारसायकल खरेदी केली. त्यानंतर त्या मोटारसायकलमध्ये बदल केले. मोटारसायकल चालवताना हाताने करावयाच्या क्रिया पायामध्ये उपलब्ध करून दिल्यास त्याला मोटारसायकल चालवणे सहज शक्‍य होईल, हा विचार पुढे आला. त्यानुसार वेग वाढवण्यासाठी ॲक्‍सीलेटर, वाहन थांबवण्यासाठी ब्रेक तसेच मोटारसायकल वळवायची झाल्यास त्याचीही क्रिया पायामध्ये करत त्यादृष्टीने अभ्यासाने संशोधनवृत्तीने बदल केले. त्यासाठी त्यांना सुमारे १९ हजार रुपये खर्च आला. पाचही विद्यार्थिनींनी केलेला हा प्रकल्प सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. या प्रकल्पासाठी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रा. जी. एस. धेंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. सामाजिक बांधिलकी ठेवून केलेल्या या प्रकल्पाबद्दल प्राचार्य डॉ. ए. टी. पिसे, विभागप्रमुख डॉ. एस. एस मोहिते, प्रा. वाय. एम. घुगल, प्रा. एस. के. पाटील, डॉ. ए. आर. आचार्य आदींसह मान्यवरांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.   

पायाने अपंग असणारे मोटारसायकल चालवत असल्याचे आपण पाहतो. मात्र, दोन्ही हात नसणाऱ्यांना मोटारसायकल चालवण्यापासून दूर राहावे लागते, हा विचार करत महाविद्यालयातील राधेय पल्ली या दोन्ही हात नसलेल्या दिव्यांगाला डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प केला. राधेय आज मोटारसायकल चालवू शकतो, हे पाहिल्यावर आम्ही केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मिळते.
 -सायली पवार, विद्यार्थिनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com