आहार साक्षरता... 

प्रा. रेखा पंडित 
शनिवार, 18 मार्च 2017

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल सर्वत्र रेडी-टू-इट पदार्थ, संरक्षित खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थ, झटपट तयार होणारे अन्नपदार्थ, जलद अन्न (Fast food), रस्त्यांवर किंवा खाऊ गल्ल्यांमध्ये मिळणारे पदार्थ आणि जंक फूड लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोकप्रिय आहेत. नुडल्स्‌ आणि पिझ्झा न आवडणारी क्वचितच आढळतात. अशा पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम दुर्लक्षित करण्यासारखे निश्‍चितच नाहीत. 

जंक फुड - धोदाकायक अन्न 
काही वेळी वेळेची गरज म्हणून जंक फूड खाल्ले जातात. काही वेळा रोजच्या जेवणात बदल म्हणून तर काही वेळा समारंभ साजरा करताना सर्वांना आवडणारे पदार्थ म्हणून असे पदार्थ आहारात दिसतात. चविष्ट अन्न म्हणून पारंपरिक अन्नपदार्थांना पर्यायी पदार्थ म्हणूनही बऱ्याचदा असे पदार्थ आहारात वापरतात. असे सगळेच पदार्थ आरोग्यास, सदोष असमतोल असे म्हणता येत नाही; परंतु कोणते पदार्थ आरोग्यास चांगले आणि कोणते पदार्थ धोकादायक याबद्दलची माहिती सर्वसामान्यांना नसल्याने असे पदार्थ नियमितपणे खाल्ले जातात. मोठ्या शहरांमध्ये तर याचा वापर दिवसेंदिवस वाढतानाच दिसतो. असे पदार्थ खाणे म्हणजे फॅशन, पुढारलेपण अशीही प्रतिष्ठितपणाची कल्पना या मागे दडलेली दिसते. 

जंक फूड म्हणजे काय? 
जंक फूडला आहारशास्त्रात असमतोल किंवा धोकादायक (unhealthy) अन्न म्हणतात. ज्या अन्नपदार्थांत प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतूमय पदार्थ यांसारखे पोषक घटक अतिशय अल्प प्रमाणात असतात किंवा अजिबात नसतात; परंतु ज्यात मीठ, साखर, निव्वळ कॅलरीज मिळतात, त्या सगळ्याच पदार्थांचा जंक फूडमध्ये समावेश होतो. चिप्स्‌, फ्रेंचफ्राइज, आईस्क्रीम, शीतपेये, चॉकलेटस्‌, पिझ्झा, बर्गर, नुडल्स्‌ आदी पदार्थ जंक फूडची उत्तम उदाहरणे आहेत. बाहेर मिळणारे बटाटेवडा, भजी, समोसा यांसारख्या भारतीय 
पदार्थांचाही काही अंशी जंक फूडमध्येच समावेश होतो. 

झटपट तयार होणारे अन्न (Instant food) 
अन्नपदार्थांवर विशिष्ट प्रक्रिया करून ते काही मिनिटांत शिजतील, अशा पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांना तयार अन्नपदार्थ म्हणतात. 

पावडर स्वरूपातील अन्नपदार्थ म्हणजे Instant Food. सूप पावडर, नुडल्स, ढोकळा, इडली, डोसा यांसारख्या पदार्थांमध्ये पावडर ही यातील लोकप्रिय उदाहरणे आहेत. प्रत्येक वेळी असे पदार्थ खाण्याला अयोग्य असतातच, असे म्हणता येत नाही. अशा प्रकारच्या काही पदार्धांमध्ये मीठ, साखर आणि कॅलरीज कमी असतात; परंतु, अशा पदार्थ्यांच्या विशिष्ट चवीसाठी उपयोगात येणाऱ्या घटकांचे प्रमाण विचार करण्यासारखे असते. 

अजायनोमोटो म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण एकूण मीठाच्या प्रमाणात वाढ करते, जे आरोग्यास धोकादायक असते तसेच हे पदार्थ फुगण्यासाठी व सच्छिद्र होण्यासाठी आंबविण्याऐवजी यात खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर घालतात. ज्यामुळे यातील ब गट जीवनसत्वे नष्ट होतात. 

जल अन्नपदार्थ (Fast Foods) 
मिल्क शेक, तळलेले मासे, पिझ्झा, सॅन्डविच, बर्गर, नूडल्स यांसारखे पदार्थ फास्ट फूड म्हणून खूप लोकप्रिय आहेत. अशा पदार्थांचा समतोल साचण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केलेला दिसतो; पण या पदार्थांची साठवण आणि हाताळणी करताना सूक्ष्म जंतूंमुळे दूषितीकरण हे काळजी करण्यासारखे असते. जास्त ऊर्जा असलेले असे पदार्थ विविध आजारांना आमंत्रण देणारे असतात. 

रस्त्यावरचे पदार्थ (Street Foods) 
Street foods ला सर्वत्रच मागणी जास्त असते. तरुणांमध्ये तर अशा पदार्थांची आवड दिवसेंदिवस वाढतानाच दिसते. पाणीपुरी, चाटपासून इडली, डोसा, उत्तपा आणि पोहे-उपमा शिरापर्यंत सगळ्याच पदार्थांची इथे रेलचेल असते. ताजे म्हणून मिळणारे असे पदार्थ खरोखरच ताजे असतात का? तसेच असे पदार्थ तयार करते वेळी स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते, हे पाहणे आवश्‍यक ठरते. स्वच्छता असेल, निर्जंतुकपणे पदार्थ हाताळले आणि साठवले जास्त असतील तर आपल्या घरगुती आहाराप्रमाणे याला पोषकतेप्रमाणे महत्त्व देता येईल; अन्यथा अशा पदार्थांपासून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्‍यता जास्त असते. 

मूल्यवर्धित अन्नपदार्थ (Fortified Fooda)- 
काही वेळा विशिष्ट प्रक्रिया केलेले पदार्थ विशिष्ट हेतूने तयार करतात. कुपोषणाचा गंभीर होत असलेला प्रश्‍न सोडविण्यासाठी अशा प्रत्येक व्यक्तींपर्यंत ताजे अन्न पोचणे शक्‍य नसते किंवा दुर्गम भागात सीमेवर लढणारे सैनिक, विशिष्ट आजारातील व्यक्तींसाठी विशिष्ट पोषकत्वे कमी किंवा जास्त असणारे अन्न, मूल्यवर्धित केलेले अन्नपदार्थही बाजारात उपलब्ध आहेत. जास्त कॅल्शियम, लोह, तंतूमय पदार्थ असलेली किंवा कमी मीठ, साखरविरहित, कमी कॅलरीज असलेली उत्पादने अन्नप्रक्रिया उद्योगामुळे उपलब्ध होत आहेत. ही उत्पादने प्रक्रिया केलेली असली तरी अशा विशिष्ट परिस्थितीत उपयोगी ठरताना दिसतात. तरीही अशा पदार्थांचा सरसकट वापर करणेही योग्य नाही. आवश्‍यकतेनुसार योग्य प्रमाणात वापर आरोग्यास फायदेशीर ठरू शकतो. 

तयार अन्न ः रोगाला निमंत्रण 
वर उल्लेख केलेले फास्ट फूड, रेडी-टू-इट, झटपट होणारे रस्त्यावरचे विविध अन्नपदार्थ दररोज खाल्ल्याने आहारातील कॅलरीज, मीठ, साखर, स्निग्ध पदार्थ, Transfat आदी घटकांचे प्रमाण वाढते, तर प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे यांसारख्या आरोग्य सृदृढ ठेवणाऱ्या पोषक घटकांचे प्रमाण मात्र कमी होते. पौष्टिकतेचा समतोल बिघडतो. पोषक घटकांच्या अभावामुळे वा अधिक्‍यामुळे होणारे अनेक आजार होतात. अशा पदार्थांतून साखर-मीठ व प्राणीजन्य स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणा, हृदयरोग, स्तनांचा व आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढलेला आढळतो. 
आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी झाल्याने पचनाचे विकार, मधुमेह, हृदयविकार व कर्करोग होण्याचा धोका वाढतो. मीठ जास्त असल्याने उच्चरक्तदाब होण्याची शक्‍यता वाढते. जीवनतत्व व खजिनांच्या कमतरतेने रक्तक्षय, हाडे ठिसूळ होणे यांसारखे आजार गंभीर रुप धारण करतात. सततच्या खाण्याने काम करण्याची क्षमता कमी होणे, दृष्टिदोष आदी आजार दिसतात. 

अशा अन्नपदार्थांचा आरोग्याला होणारा धोका लक्षात घेऊन त्यांचा संयमी स्वरूपात वापर करणे हेच फिटनेसच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. 

Web Title: Food Literacy