माजी सैनिकांचा परिचारकांच्या घरावर धडक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पंढरपूर - आमदार प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक व सैनिक पत्नींनी त्यांच्या पंढरपूर येथील घरावर मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना महाद्वार चौकात रोखून धरले. त्यामुळे माजी सैनिकांनी चौकातच निषेध सभा घेऊन परिचारकांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पंढरपूर - आमदार प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक व सैनिक पत्नींनी त्यांच्या पंढरपूर येथील घरावर मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना महाद्वार चौकात रोखून धरले. त्यामुळे माजी सैनिकांनी चौकातच निषेध सभा घेऊन परिचारकांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारा दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींच्या चारित्र्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. आमदार परिचारकांनी तत्काळ हे विधान मागे घेत भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुुंबीयांची माफी मागीतली आहे. 

त्यानंतर हे प्रकरण थांबेल, असे वाटत असतानाच आमदार परिचारक यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावे या मागणीसाठी माजी सैनिकांनी पुन्हा राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. याच मागणीसाठी आज कोल्हापूर व सोलापूर जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने आमदार परिचारक यांच्या घरावर मोर्चा काढला. 

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या माजी सैनिक व त्यांच्या पत्नींनी आमदार परिचारकांचा निषेध करून त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. नायब तहसीलदार सीमा सोनावणे यांना लेखी निवेदन दिल्यानंतर माजी सैनिकांनी मोर्चा संपल्याचे जाहीर केले. मोर्चामध्ये बबनराव रानगे, शिवाजी पडुळेकर, सोमनाथ घोडेराव, आनंदा पाटील, शैलजा भोसले, एस.पी.कांबळे, एस.एन.घाटगे, बाळासाहेब पवार, सर्जेराव पाटील, सुखदेव बुध्याळकर, आनंदा धनवडे, अर्जुन चव्हाण, महादेव नागटिळक, किरण घाडगे, अमरजित पाटील, बाबुराव बोडके, दादासाहेब पाटील, ऐ.डी.पाटील, दत्तात्रय पाटील, जी. एस. पाटील यांच्यासह माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय तसेच काही स्थानिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

माजी सैनिक व पोलिसांमध्ये तणाव
सकाळीच सर्व मोर्चेकरी पंढरपुरातील शिवाजी चौकात जमा झाले होते. शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा प्रदक्षिणा मार्गावरुन महाद्वार चौकात आला. यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना त्यांच्या घराकडे जाण्यापासून रोखून धरले. यावेळी माजी सैनिक व पोलिसांमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना परिचारकांच्या घराकडे जाण्यास मज्जाव केल्यामुळे संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी चौकातच ठिय्या मारुन निषेध सभा घेतली.

Web Title: Former soldiers Rally on MLA prashant paricharak house