भग्न मूर्ती किती दिवस पाहणार?

भग्न मूर्ती किती दिवस पाहणार?

कोल्हापूर - गणेशमूर्तींचे विसर्जन नदीतच करायचे. त्यानंतर त्या मूर्तीची अवस्था काय झाली हे पाहायलाही टाळायचे. आणि या विसर्जित झालेल्या, अस्ताव्यस्त पडलेल्या मूर्ती उचलण्याचे काम जणू काही ठराविकांनीच करायचे हा विसर्जनाचा पायंडा पडूनच गेला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी, राजाराम तलाव, कसबा बावडा येथे आज या क्षणीही मोठ्या भग्न मूर्ती पडून आहेत. या मूर्तींची अवस्था ज्यांना बघवत नाही, ते त्यांच्या परीने मूर्ती उचलत आहेत; पण हे असेच किती वर्षे चालणार हा खरा प्रश्‍न आहे. 

कारण पंचगंगा नदी सर्वांची आहे. गणेश उत्सवही सर्वांचा आहे. असे असताना विसर्जनानंतरच्या भग्न मूर्तीबद्दलही सर्वानुमते मार्ग निघण्याची गरज आहे. कारण गणेशोत्सवाच्या काळात अतिशय श्रद्धेने जपलेल्या या मूर्तीची विसर्जनानंतर होणारी अवस्था खूप केविलवाणी आहे. 

मूर्ती नदीतच विसर्जित करायच्या असा काहींचा आग्रह आहे; तर मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्याने नदीचे प्रदूषण वाढत आहे. एवढेच नव्हे तर न विरघळलेल्या मूर्तींचा ढीग नदीच्या काठावर दिसतो हे चित्र विदारक असल्याची भूमिका पंचगंगा नदी प्रेमींची आहे.  गणेशमूर्ती जर शाडूच्या असत्या तर त्या नदीच्या पात्रात सोडल्यावर पाण्यात विरघळूनही गेल्या असत्या; पण परिस्थिती खूप विचित्र आहे. मूर्ती प्लास्टरच्या असल्याने त्या जशाच्या तशा पाण्यात आहेत. नदी पात्रातले पाणी कमी झाल्याने अस्ताव्यस्त पडलेल्या स्थितीत आहेत. 

मूर्तीची ही अवस्था पाहून पंचगंगा संवर्धन समितीचे कार्यकर्ते विसर्जनानंतर दोन-तीन दिवसांनी पात्रात वर दिसणाऱ्या मूर्ती बाहेर काढतात. त्यासाठी एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतात. यावर्षी त्यांनी सात ते आठ हजार मूर्ती बाहेर काढल्या; पण मोठ्या मूर्ती बाहेर काढणे त्यांच्या ताकदीबाहेरचे आहे. त्यामुळे त्या मूर्ती अर्धवट बुडालेल्या अवस्थेत नदीपात्रात पडून आहेत. 

विशेष हे की या मूर्ती काढण्यासाठी पंचगंगेचे पात्र स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पण उत्सव संपला की काहींचा उत्साहच संपतो. कालपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मूर्ती आज भग्नावस्थेत दलदलीत पडून आहेत, हे पाहून कोणाला काहीच वाटत नाही. ज्यांना वाटते त्यांची ताकद अपुरी पडते. या मूर्ती भरून न्यायला कोणी ट्रॅक्‍टर, डंपरही भाड्याने द्यायला तयार होत नाही. 

हातभार लावण्यास पुढे येण्याची गरज
पंचगंगा नदीकाठावरील सात ते आठ हजार मूर्ती पंचगंगा संवर्धन समितीने एकत्रित करून इराणी खणीत पुन्हा विसर्जित केल्या आहेत. या वेळी या मूर्ती जर वेड्यावाकड्या पद्धतीने खणीत टाकल्या तर तुमचं खरं नाही, असा इशारा त्यांना मिळाला होता. तरीही गणेशावरची व पंचगंगेवरची श्रद्धा म्हणून या मूर्ती त्यांनी इराणी खणीत विसर्जित केल्या आहेत. आता मोठ्या मूर्तींचाच प्रश्‍न आहे. मात्र सारे कोल्हापूरकर एक तासभर एकत्र आले तर या मूर्तीही बाहेर काढून त्यांचे पुन्हा खणीत विसर्जन करणे शक्‍य आहे. 

आम्ही पंचगंगा संवर्धन समितीचे सदस्यही हिंदूच आहोत. गणेशावर व पंचगंगेवर आमची श्रद्धा आहे. विसर्जित केलेल्या मूर्ती शाडूच्या असत्या तर विरघळून गेल्या असत्या. मूर्ती दान करा हे सांगायचीच गरज नव्हती; पण अजूनही खूप मूर्ती नदीकाठावर पडून आहेत. ते दृश्‍य खूप विदारक आहे. गणेशावर, पंचगंगेवर, निसर्गावर, पर्यावरणावर श्रद्धा असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन या मूर्ती काढूया.’’ 
- विजय ससे, महेश कामत, सुमित वैद्य  पंचगंगा संवर्धन समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com