मुलांकडे वाहन देताना शिस्तीचेही धडे द्या - जिल्हाधिकारी डॉ. सैनी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

कोल्हापूर - सज्ञान मुलांकडे वाहन देताना आई-वडिलांनी स्वयंशिस्तीचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज केले. २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान ९ ते २३ जानेवारी पंधरवड्याअंतर्गत ‘आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या’ या जनजागृती कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूर - सज्ञान मुलांकडे वाहन देताना आई-वडिलांनी स्वयंशिस्तीचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज केले. २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान ९ ते २३ जानेवारी पंधरवड्याअंतर्गत ‘आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या’ या जनजागृती कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील रामानंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.

डॉ. सैनी म्हणाले, ‘‘प्रत्येक तासाला २ मृत्यू असे राज्यात प्रमाण आहे. दुसऱ्यांच्या चुकांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक असल्यामुळे वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्‍यक आहे. वाहनमालकांनी त्यांच्या चालकांची मानसिकता विचारात घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा, त्याच्या कुटुंबाची सुरक्षा ही जाणीव लक्षात घेऊन वाहन चालविण्याचा परवाना देताना काटेकोर तपासणी गरजेची आहे.’’

जिल्हा पोलिस अधीक्षक तांबडे म्हणाले, ‘‘प्रत्येकाला जीवाची काळजी असली पाहिजे. अतिघाई, व्यसनाधीनता, अहंकार, स्वयंशिस्तीचा अभाव ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. कायद्याची जाणीव जागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातून जनजागृती होणे अपेक्षित आहे.’’

ओव्हरटेकप्रसंगी अहंकाराच्या प्रभावामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होते. त्यामुळे अहंकार अपघाताचे महत्त्वाचे कारण आहे. यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले तर अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्‍वास प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांनी व्यक्त केला. बहुतांश अपघातांत डोक्‍यास गंभीर इजा झाल्याने मृत्यू असून, २० ते ३५ वयोगटात पुरुषांमध्ये हे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे हेल्मेट आवश्‍यक असल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील रामानंद यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी ‘आपली सुरक्षा कुटुंबाची रक्षा’ या कार्यक्रमात ८० कार्यक्रमांचा समावेश केला असून २० कार्यक्रम शाळा, महाविद्यालय स्तरावर घेणार असल्याचे सांगितले. येथे रस्ता सुरक्षा अभियानाबाबतच्या चिन्हांचे व साहित्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी सैनी यांच्या हस्ते झाले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे उपस्थित होते. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. शहर पोलिस वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आभार मानले.

कोल्हापुरात १८ ठिकाणे धोकादायक
कोल्हापूर शहरात १८ ठिकाणे अपघातप्रवण ठिकाणे म्हणून निश्‍चित केली आहेत. या ठिकाणी ‘टेस्टिंग ट्रप’ ही नवीन प्रणाली सुरू करण्यात येत असून या प्रणालीतून चालकांच्या चुका निदर्शनास येतील. त्यामुळे चांगले चालक निर्माण होतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Give children the lessons of discipline in his vehicle