माणमधील पाणीसाठे कोरडेच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

यंदाही पावसाने फिरवली पाठ; आंधळी, पिंगळी, राणंद तलावांत ठणठणाट

गोंदवले - कायमचा दुष्काळ हटविण्यासाठी शासनासह लोकांनीही पाणी अडविण्यासाठी प्रयत्न केले खरे; पण नेहमीप्रमाणेच माण तालुक्‍यात पावसाने यंदाही पाठ फिरविल्याने सर्वच पाणीसाठे कोरडेच असल्याचे चित्र आहे. जलसंधारणाची कामे झाली, आता गरज आहे ती फक्त दमदार पावसाची अशीच चर्चा लोकांमधून ऐकायला मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे त्या भागातील पाणीसाठे तुडुंब झाले. परंतु, पूर्वेकडील माण तालुक्‍यात मात्र अद्यापही पावसाचा लपंडाव सुरू आहे. गेल्या वर्षीदेखील माणमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने बहुतांश पाणीसाठ्यांमध्ये वर्षभर पुरेल एवढेही पाणी साठले नव्हते. शासनाने तसेच लोकांनी उत्स्फूर्तपणे जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी अनेक उपाययोजना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला. 

या झालेल्या कामांच्या माध्यमातून त्या गावांची पाण्याची तहान नक्कीच भागणार असल्याचे स्वप्न येथील लोक पाहात आहेत. परंतु, हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता खरी गरज आहे ती दमदार पावसाची. गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे पाणीसाठे कोरडे आहेत. परिणामी गेल्या सुमारे चार महिन्यांपासून लोकांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. तालुक्‍यातील आंधळी, पिंगळी, राणंद या तलावांमध्ये ऐन पावसाळ्यातही ठणठणाट आहे. त्याशिवाय लोधवडे, पर्यंती, मासाळवाडी, जाशी, ढाकणी, महाबळेश्वरवाडी, जांभुळणी या तलावांची अवस्थाही बिकट आहे. परिणामी पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून, हाच प्रश्न लोकांपुढे आहे. 

...तर २० गावांचा पाणीप्रश्‍न मिटेल!
माण तालुक्‍यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या उरमोडी योजनेचेही पाणी सध्या सोडण्यात आलेले नाही. या योजनेतून येणारे पाणी पिंगळी तलावात सोडण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी आल्‍यास पिंगळी तलावालगतच्या सुमारे २० गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र, सध्या तरी लोकांची तहान भागविण्यासाठी दमदार पावसाचीच आवश्‍यकता आहे.