माजी 'सीएम'च्या दौऱ्यातही गटबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

कॉंग्रेसमधील वातावरण - पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्याकडे सतेज गटाची पाठ

कोल्हापूर - कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंगळवारच्या कोल्हापूर दौऱ्यात कॉंग्रेसमधील गटबाजीचे पुन्हा एकदा दर्शन झाले. श्री. चव्हाण यांच्या स्वागताला माजी राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही पाठ फिरवल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

सत्ता असो किंवा नसो, पक्षाचे माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते एखाद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील तर त्यांच्या स्वागताला पक्षातील माजी मंत्री, आमदार, खासदार किंवा त्यांची सत्ता असलेल्या सत्ता केंद्रातील पदाधिकाऱ्यांनी जाणे हा अलिखित नियम आहे. यापूर्वीही हा संकेत पाळला आहे. अपवाद सोडला तर अनेक वेळा नियमाचे पालनही होते; पण कालचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दौरा मात्र त्याला अपवाद ठरला. श्री. चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील एक कार्यक्रम स्वीकारला होता. मंगळवारी रात्री कार्यक्रम होता. तत्पूर्वी त्यांचे कॉंग्रेस कमिटीत आगमन झाले. त्यावेळी पी. एन.समर्थक वगळता कोणीही त्यांच्या स्वागताला नव्हते.

आमदार सतेज पाटील हे काही कामानिमित्त पुण्याला गेल्याचे समजते. महापालिकेत उपमहापौर, जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांसह या दोन्ही ठिकाणचे पदाधिकारी हे श्री. पाटील यांचे नेतृत्त्व मानणारे आहेत.

उपमहापौरांची निवड तर आठवड्यापूर्वीच झाली आहे. पक्षाची ज्येष्ठ व्यक्ती व माजी मुख्यमंत्री कोल्हापुरात पक्षाच्या कार्यालयात येत असताना हे पदाधिकारीही त्यांच्या स्वागताला दिसले नाहीत.

"गोकुळ'चे करवीरमधील सर्व संचालक, तसेच पी. एन. पाटील यांना मानणारे काही मोजकेच कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयात होते. सत्ता असताना पक्षाचा साधा मंत्री आला तरी कार्यालयात पाय ठेवायला जागा मिळत नसे. आज सत्ता नसतानाही काही ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान पक्षात केला जातो; पण कालचा श्री. चव्हाण यांचा दौरा मात्र त्याला अपवाद ठरला. याचीच चर्चा सध्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांत सुरू आहे.