कोल्हापूर शहर ओलेचिंब

कोल्हापूर शहर ओलेचिंब

कोल्हापूर- पावसाळा सुरू झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच पावसाची संततधार शहरवासीयांनी अनुभवली. आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाची उघडझाप सुरूच होती, मात्र दिवसभर सतत पावसाच्या सरी येत होत्या. पावसाच्या झिम्माड सरींनी शहरवासीय ओलेचिंब झाले. राधानगरीत पावसाचा जोर कमी झाल्याने नदीची पातळी तीन फुटांनी कमी झाली. 

आज २६.३ फूट पातळी नोंद झाली. रविवारी सुटी असल्याने पावसाळी पर्यटनाला निघालेल्यांची गर्दी पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा रस्त्याला दिसत होती. ढगाळ वातावरण, थंड हवा आणि बरसणाऱ्या जलधारा कोणालाही प्रसन्न करून जातात. पावसाचे शरीरावर उडणारे तुषारही मनाला ओलेचिंब करून जातात. निसर्गातील हिरवळ, नदी-ओढ्यांमधील मातकट पाणी आणि काळ्या ढगांनी व्यापलेले आकाश अशी रंगांची उधळण अवतीभोवती पाहायला मिळते. पावसाचे हे मनोहारी रूप आज करवीरवासीयांनी मनसोक्त अनुभवले. 

रंकाळा, आयसोलेशन हॉस्पिटल, टाऊन हॉल, शासकीय विश्रामगृह येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांनी पावसातच चालणे पसंत केले. भरलेल्या रंकाळ्यावर कोसळणाऱ्या पावसाचे रुद्र रूपही त्यांनी न्याहाळले. शिवाजी विद्यापीठ, चित्रनगरी, कात्यायनी परिसर, चंबुखडी हा परिसर हिरवाईने नटला आहे. विद्यापीठातील पाझर तलाव भरले  असून ओहळांमधून खळखळणारे पाणी, हिरवा गालीचा अंथरल्याप्रमाणे भासणारा माळ सर्वांनाच आकर्षित करत असल्याने इथे फिरायला येणाऱ्यांची संख्याही अधिक होती.  पिकनिक पॉईंटवरून पाहणाऱ्यांना हिरव्यागार शेतांच्या बाजूने मातकट रंगाचे पाणी घेऊन दुथडी भरून वाहणारी पंचगंगा विलोभनीय दिसत होती. भर पावसात मासे पकडणाऱ्यांकडचे ताजे मासे घेण्यासाठी नदी घाटावर शौकिनांची गर्दी होत होती.

हुल्लडबाजांवर कारवाई
राधानगरी येथील राऊतवाडी येथे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या आणि धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या ३९ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ७,८०० रुपयांचा दंड त्यांनी वसूल केला. पोलिस निरीक्षक के. एन. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई करून पर्यटकांना शिस्त लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com