घरफाळा सर्वेक्षणात तोडपाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

कोल्हापूर - महापालिकेने जीआयएस प्रणालीद्वारे सुरू केलेल्या घरफाळा सर्वेक्षणातही तोडपाणी होत असल्याचा आरोप करत नगरसेवक राहुल चव्हाण यांनी सर्वसाधारण सभेत खळबळ उडवून दिली. एका फ्लॅटधारकाकडे किती पैसे मागितले, याचे फोनवरचे संभाषणच राहुल चव्हाण यांनी आयुक्त पी. शिवशंकर व संपूर्ण सभागृहासमोर ऐकविले. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी आणखी सखोल चौकशी करून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीवर कारवाई करू, असे आश्‍वासन दिले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हसीना फरास होत्या.

कोल्हापूर - महापालिकेने जीआयएस प्रणालीद्वारे सुरू केलेल्या घरफाळा सर्वेक्षणातही तोडपाणी होत असल्याचा आरोप करत नगरसेवक राहुल चव्हाण यांनी सर्वसाधारण सभेत खळबळ उडवून दिली. एका फ्लॅटधारकाकडे किती पैसे मागितले, याचे फोनवरचे संभाषणच राहुल चव्हाण यांनी आयुक्त पी. शिवशंकर व संपूर्ण सभागृहासमोर ऐकविले. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी आणखी सखोल चौकशी करून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीवर कारवाई करू, असे आश्‍वासन दिले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हसीना फरास होत्या.

महापालिकेने गतवर्षीच जीआयएस प्रणालीद्वारे घरफाळ्याचे सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा ठेका एका कंपनीला दिला आहे. या कंपनीने शहरातील सुमारे १५ हजार मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण केले. करचुकवेगिरीला आळा बसावा, यासाठी ही पद्धत अमलात आणली; परंतु या पद्धतीतही सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी तोडपाणी करत असल्याचा आरोप करत नगरसेवक राहुल चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रत्येक घरात जाऊन हे कर्मचारी जनतेला लुटायचे काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या वेळी मुरलीधर जाधव यांनी असे बोगस काम करणाऱ्या कंपनीला ५० लाखांचे बिल दिलेच कसे, असा सवाल करत धारेवर धरले. भूपाल शेटे यांनीही उपायुक्त ज्ञानेश्‍वर ढेरे यांना बिल देण्याची घाई का झाली, असा प्रश्‍न उपस्थित केला.

सर्वेक्षणाच्या या मुद्द्यावरून अजित ठाणेकर, सत्यजित कदम, सुनील कदम यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांनी जरी या कामाचा ठेका कंपनीला दिला असला तरी देखील केलेल्या सर्व्हेची फेरपडताळणी महापालिका करत असल्याचे सांगितले. या कंपनीने केलेल्या १५ हजार मिळकतीपैकी ७५०० मिळकतींची फेरपडताळणी केल्याचे कारंडे यांनी सांगताच सदस्यांनी पुन्हा कारंडे यांना धारेवर धरले. पन्नास टक्के कामात मापात पाप असेल तर या कंपनीचा ठेकाच रद्द करा, अशी मागणी राहुल चव्हाण यांनी केली. त्याला इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला. घरफाळा विभागाच्या या कामावर चौफेर टीका होत असतानाच कारंडे यांनी गेल्या काही वर्षांत मालमत्तांच्या नोंदी वाढल्याचे सांगितले. यावर प्रा. पाटील यांनी यात घरफाळा विभागाचे काही योगदान नाही, ज्या मिळकतधारकांनी स्वत: येऊन नोंदी केल्या, त्यांच्यामुळेच ही संख्या वाढली असल्याचे सांगितले. त्यामुळे या विभागाने स्वत:ची पाट थोपटून घेऊ नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

घरफाळा विभाजन नकोच - कदम
सत्यजित कदम म्हणाले, ‘‘मालक वापर आणि कूळ वापर असे विभाजन करून घरफाळा आकारूच नका. अन्यथा दुकानदारी सुरू होईल. त्याऐवजी सरसकट मालक वापर म्हणूनच घरफाळा आकारणी करा. त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही.’’
 

आकृतिबंधावरूनही प्रशासन धारेवर 
आस्थापनावरील पदांचा आकृतिबंध सुधारित करण्यावरूनही सुनील कदम, जयंत पाटील, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, किरण नकाते यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकारी वाढवू नका तर काम करणारे कर्मचारी वाढवा, असे म्हणत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यास विरोध केला. ३० वर्षांनंतर हा आकृतिबंध तयार होत आहे; तर घाईगडबड कशासाठी करता? नगरसेवकांना हा आकृतिबंध समजून सांगा, असे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. सुनील कदम यांनी अधिकारी भरतीत सेटिंग झाल्याचा आरोप केला.

भोसले यांचे प्रमोशन बेकायदेशीर : शेटे
नगरसेवक भूपाल शेटे म्हणाले, ‘‘संजय भोसले यांना सहायक आयुक्तपदी प्रमोशन दिले; पण ते बेकायदेशीर आहे. त्यांच्यामुळे इतर अनेकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे याचा विचार करावा.’’ तर प्रा. जयंत पाटील यांनी स्पर्धा परीक्षेसारखी परीक्षा घ्या आणि चांगल्या अधिकाऱ्यांना संधी द्या, असे मत व्यक्त केले. अजित ठाणेकर यांनी सहायक आयुक्तांच्या वेतनश्रेणीतील तफावत निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या चुका दाखवून दिल्या. प्रवीण केसरकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या हितासाठी झोकून देउन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदेशीररीत्या प्रमोशन द्या.’’

Web Title: home tax survey manage