गृहिणी महोत्सवास दिमाखात प्रारंभ

गृहिणी महोत्सवास दिमाखात प्रारंभ

कोल्हापूर - महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जागर स्त्रीशक्तीचा गृहिणी महोत्सवाची सुरवात आज महिलांच्या प्रबोधनात्मक रॅलीने झाली. पारंपरिक वेशभूषेत आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात या रॅलीची सुरवात दसरा चौकातून महापौर हसीना फरास, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका फेम अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्यासह आणि आमदार सतेज पाटील, प्रतिमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून झाली. 

रॅली दसरा चौक ते शाहूपुरी जिमखाना या मार्गावर काढण्यात आली. यावेळी रॅलीतील सहभागी महिलांनी विविध सामाजिक संदेश दिले. रुपाली नांगरे-पाटील, ऋतुराज पाटील, उपमहापौर अर्जुन माने, नेमबाज राही सरनोबत आदी उपस्थित होते.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, सतेज पाटील फौंडेशन आणि प्रतिमा पाटील सोशल वेल्फेअरतर्फे गृहिणी महोत्सवास आजपासून शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरवात झाली. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्यासह अमोल नाईक यांनी आवर्जून हजेरी लावली. जोशी आणि देवधर यांच्या हस्ते या रॅलीची सुरवात झाली. त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्तुत्य उपक्रम गरजेचं असल्याचं हार्दिक जोशी यांनी सांगितलं.

पारंपरिक वेशभूषा करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या रॅलीची शोभा शालेय विद्यार्थ्यांनी झांजपथक, लेझीम खेळाच्या सादरीकरणाने वाढवली. कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, अशी मागणी वारंवार होत आहे. खंडपीठाच्या मागणीसाठी महिला वकिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. रोटरी इनरव्हिल क्‍लब कोल्हापूरच्या महिलांनी शैक्षणिक जनजागृतीचे संदेश दिले, तर एकटी संस्थेने समाजातील विधवा आणि परित्यक्ता महिलांच्या हक्क आणि अधिकाराविषयी विविध संदेश दिले. 

या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांसह शाहू हास्य क्‍लबच्या ७० ते ८० वर्षांच्या महिलाही सहभागी झाल्या. खेळाच्या क्षेत्रात ज्यांनी नाव कमावले, अशा खेळाडूंचा सहभाग रॅलीचे वैशिष्ट्य ठरले. दरम्यान, जिमखाना मैदान येथे रॅलीचा समारोप झाला. 

गृहिणी महोत्सवाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, अंशू सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी शांतादेवी डी. पाटील, आमदार सतेज पाटील, महापौर हसीना फरास, प्रतिमा पाटील, सरलाताई पाटील, संध्या घोटणे स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण केसरकर उपस्थित होते. महोत्सवात शंभराहून अधिक स्टॉल्स आहेत. निम्याहून अधिक स्टॉल्स बचत गटांना दिले आहेत. गृहपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत महोत्सव चालणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com