पाणीपुरवठा संस्थांच्या वीज बिलात सव्वा तीन पट वाढ

पाणीपुरवठा संस्थांच्या वीज बिलात सव्वा तीन पट वाढ

कुडित्रे - काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतीपंपाचा प्रतियुनिट ७२ पैसे वीजदर होता. तो आता भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळात दोन रुपये ३७ पैसे झाला. पाणीपुरवठा संस्थांच्या वीज बिलात प्रतियुनिट सव्वा तीन पट वाढ झाली. याला इरिगेशन फेडरेशनही दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यातील कृषी शेतीपंपधारक, सहकारी पाणीपुरवठा व डबल लिफ्ट संस्थांना महिन्याला सुमारे पाच कोटींचा भुर्दंड बसणार आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल. 
केंद्रात मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये शेतकऱ्यांना वीज दरवाढ लादणार नाही व सवलतीच्या दरात वीज देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, चार वर्षांत वीज दरवाढ करून शेतकऱ्यांची लूट केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे. १ सप्टेंबरपासून आयोगाने वीज दरवाढ केली.

जिल्ह्यात शेतीपंपाचे एक लाख ३९ हजार १७८ वीजग्राहक शेतकरी आहेत. डबल लिफ्ट उपसा सिंचनाचे ३५५, तर कमी एचपीचे ६० हजार वीजग्राहक शेतकरी व संस्था आहेत. या सर्व शेतकरी व संस्थांना वीज दरवाढीचा फटका बसणार आहे. मीटर असलेल्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांना प्रति अश्‍वशक्ती २४ रुपये स्थिर आकार होता. यात वाढ करून ३५ रुपये झाला. उच्चदाब शेतीपंप ग्राहकांच्या वीजदरात ४४ रुपये प्रति केव्हीए असणाऱ्या स्थिर आकारात वाढ होऊन ६० रुपये झाला आहे. यामुळे शेतकरी व संस्थांना महिन्याला सुमारे चार ते पाच कोटींचा भुर्दंड बसेल.
लघुदाब ग्राहकांमध्ये वीज आकार २०१५ मध्ये ८५ पैसे प्रतियुनिट होता. यात वाढ होऊन एक रुपया ५० पैसे झाला. यात जवळपास ७६ टक्के वाढ झाली. तसेच, स्थिर आकार २४ रुपये प्रति अश्‍वशक्ती होता, तो आता ३५ रुपये झाल्याने यात ४० टक्के वाढ झाली आहे.

गेल्या तीन वर्षांत शेतमालाच्या किमतीत कवडीचीही वाढ झालेली नाही. मात्र, प्रचंड वीज दरवाढ करून सरकार ‘महावितरण’च्या आडून शेतकऱ्यांची लूट करीत आहे.
- विक्रांत पाटील-किणीकर,
अध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन

उच्चदाब शेतीपंप ग्राहकांचा ७२ पैसे असणारा वीजदर दोन रुपये ३७ पैसे झाला. यात स्थिर आकार ४५ प्रती केव्हीए होता. त्यात वाढ होऊन ६० रुपये झाला. यात ४६ टक्के वाढ झाली. ही बहुवार्षिक वीज दरवाढ नसून, ही मध्यावधी वीज दरवाढ आहे. पुढच्या वर्षी आणखी वीज दरवाढीची २० ते २५ टके वीज दरवाढ करण्यास महावितरण कंपनीने मंजुरी घेऊन ठेवली आहे. 

दृष्टिक्षेपात

  • शासनाचे अनुदान दोन रुपये १६ पैसे
  • वीज उत्पादन खर्चानुसार २० टक्के वाढ
  • २० टक्के सवलत धोरण भविष्यात येणार
  • पुन्हा वीज दरवाढीचा शॉक बसणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com