स्वातंत्र्य दिनापासून राज्यात सायबर क्राइम लॅब

परशुराम कोकणे - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सर्व प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त
सोलापूर - सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांत सायबर क्राइम लॅब स्थापन करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार येत्या स्वातंत्र्य दिनापासून (ता. 15 ऑगस्ट 2016) सर्व जिल्ह्यांत सायबर क्राइम लॅबची सुरवात होणार आहे. या लॅबमुळे फेसबुक, व्हॉट्‌स ऍपसह इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवून गुन्हा करणाऱ्यांचा शोध घेण्यास मदत होणार आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन व्यवहार करणे सोयीचे झाले असले, तरी त्यातील गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. हॅकिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. राज्यात सध्या फक्‍त मुंबईत सायबर लॅब आहे. या लॅबवर मोठा ताण येत असून, त्यामुळे गुन्ह्यांचे तपास प्रलंबित राहत आहेत. सायबर क्राइमचा तपास करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात एक सायबर लॅब उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी केली होती. आठ फेब्रुवारी 2016 रोजी या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांमध्ये सायबर क्राइम लॅबची सुरवात होणार आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी लॅबची सुरवात करायची असल्याने स्वतंत्र कक्ष, अत्याधुनिक साहित्य आणि मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्याची धावपळ सुरू आहे. लॅबसाठी उच्च प्रतीचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर केला जाणार आहे.

ब्रिजेश सिंहांकडे जबाबदारी
माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्याकडे राज्याच्या सायबर क्राइम विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सायबर क्राइम लॅबची रचना करण्यात येत आहे. काम पूर्ण होत नाही तोवर बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले. 15 ऑगस्ट रोजी सायबर लॅब सुरू करण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.