टोमॅटोवर कोटींची गुंतवणूक

Tomato
Tomato

मलवडी - माणगंगा पुनरुज्जीवन, साखळी सिमेंट बंधारे व जलयुक्त शिवार योजनेतील कामांना निसर्गाने दिलेली साथ यामुळे मलवडी परिसरात भर उन्हाळ्यातही मुबलक पाणी आहे. याच पाण्याच्या भरवशावर मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी, परकंदी या परिसरात सात ते आठ लाख टोमॅटो रोपांची लागण करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी कोट्यवधीची गुंतवणूक या पिकावर केली आहे.

भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी ही गावे तरकारीसाठी प्रसिध्द आहेत. या गावांमध्ये नेहमीच कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर अशा फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवल्या जातात. यातून या गावांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. यंदा जलसंधारणाच्या चांगल्या कामांना पावसाने साथ दिल्याने मलवडी व परकंदीतही उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. काही शेतकरी कांदा, कलिंगड, काकडी, मेथी, कोथिंबीर लावत असले तरी बहुतांशी शेतकरी टोमॅटो पिकाकडे वळले आहेत.

बहुतांशी टोमॅटो लागवड झाली असली तरी अजून काही शेतकरी टोमॅटो लागवडीची तयारी करत आहेत. पाण्याची खात्री असली तरी टोमॅटो लागवड केलेल्या जवळपास ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बेड पध्दती, ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ठिबकच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी बचतीबाबत व त्यातून होणाऱ्या फायद्यांबाबत शेतकरी जागरूक झालेला दिसत आहे.

मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होऊन कोट्यवधींची गुंतवणूक शेतकऱ्यांनी केली असली तरी टोमॅटोला मिळणारा दर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांना सुबत्ता प्राप्त होईल, अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

टोमॅटो लागवडीचा एकरी खर्च (फळधारणा होईपर्यंत)
 नांगरणी     २००० रुपये
 रोटर     १६०० रुपये
 शेणखत     १८८०० रुपये
 सरी पाडणे     १००० रुपये
 ठिबक सिंचन साहित्य     ३०००० रुपये
 टोमॅटो रोपे     ७७०० रुपये
 टोमॅटो लागण     ९०० रुपये
 काठी     १६४०० रुपये
 लोखंडी तार     १८०० रुपये
 सुतळी     १८०० रुपये
 टोमॅटो झाड बांधणी     २४००० रुपये
 भांगलण     ३६०० रुपये
 औषधे     ५००० रुपये
 एकूण खर्च     १,३०,८००

यात नंतर बांधणी, तोडणी, औषध फवारणी, खत घालणे, वाहतूक व इतर खर्च येतो. त्यामुळे सर्वसाधारण एकूण खर्च हा दोन लाखांच्या पुढे एका एकराला येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com