जे. एफ. पाटील यांनी विकास योजना दिल्या - डॉ. नाचणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

मिरज - दारिद्य्राच्या मूल्यमापन व त्याच्या निर्मूलनासाठी योजना राबवल्या पाहिजेत, याचे भान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी दिले. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकास योजना त्यांनी सुचवल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. दिलीप नाचणे यांनी केले. डॉ. पाटील यांचा येथे पटवर्धन हॉलमध्ये अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार झाला. डॉ. नाचणे प्रमुख पाहुणे होते. "अर्थक्षेत्रातील दीपस्तंभाचा गौरव' या शब्दांत उपस्थितांनी "जे.एफ.' यांच्याबद्दला भावना व्यक्त केल्या. 

मिरज - दारिद्य्राच्या मूल्यमापन व त्याच्या निर्मूलनासाठी योजना राबवल्या पाहिजेत, याचे भान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी दिले. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकास योजना त्यांनी सुचवल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. दिलीप नाचणे यांनी केले. डॉ. पाटील यांचा येथे पटवर्धन हॉलमध्ये अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार झाला. डॉ. नाचणे प्रमुख पाहुणे होते. "अर्थक्षेत्रातील दीपस्तंभाचा गौरव' या शब्दांत उपस्थितांनी "जे.एफ.' यांच्याबद्दला भावना व्यक्त केल्या. 

आमदार जयंत पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. बी. पी. साबळे, उद्योजक अरविंदराव मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. नाचणे म्हणाले,""डॉ. पाटील यांनी शिक्षक, प्रशासक, अर्थ अभ्यासक अशा भूमिका पूर्ण क्षमतेने वठवल्या. काही वर्षांत कृषी क्षेत्राचे प्रमाण घटले. त्यावर अवलंबिताचे प्रमाण कायम राहिले. त्यामुळे दारिद्य्र वाढते आहे. त्याचे निर्मूलन हा डॉ. पाटील यांच्या संशोधनाचा विषय राहिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्महत्या, सिंचन, वीजनिर्मिती अशा अनेक प्रश्‍नांवर अविरत लेखन केले. कामगारांसाठीचा नवा कायदा संसदेत येऊ घातला आहे; त्याचे कोणते परिणाम होणार यावरही त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. 

आमदार पाटील म्हणाले,""राज्याचा अर्थसंकल्प आम्ही सादर केला, तेव्हा नेमकी टीका किंवा विश्‍लेषण त्यांनी केले. त्यांची कामगिरी दीपस्तंभासारखी आहे.'' 

डॉ. साळुंखे म्हणाले,""डॉ. पाटील यांना विरोध करणारेच नंतर त्यांचे जिवलग झाले. शिवाजी विद्यापीठात महावीर अध्यासनासाठीही त्यांनी मोठी कामगिरी केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वीस वर्षे जुन्या अभ्यासक्रमात त्यांनी बदल आणला. कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

डॉ. पाटील म्हणाले,""पाटील पण शेतजमीन नसल्याने भूमिहीन पाटील आहे. प्रामाणिक पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा. अर्थतज्ज्ञ झालो तरी पैसे मिळवणे जमले नाही. समाजातील लोक उदारमतवादी लोकशाहीची संकल्पना विसरले आहेत. राजकारणाचे स्वार्थकारण होत आहे. राजकारण म्हणजे प्रजेचं कल्याण. ते करणाऱ्यांशी माझा संबंध आला.'' 

रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी जे. एफ. पाटील यांची चित्तवेधक रांगोळी रेखाटली होती. त्यांचा सत्कारही झाला. 

डॉ. पाटील व त्यांच्या पत्नी कमल यांचा मानपत्र देऊन सत्कार झाला. उपस्थितांनी त्यांना मानवंदना दिली. प्रा. हाबळे यांनी संस्कृत भाषेतील मानपत्र दिले. प्रा. सुभाष दगडे यांनी मराठी मानपत्राचे वाचन केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, प्रा. वसंतराव देसाई, बापूसाहेब पुजारी, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आर. डी. सावंत उपस्थित होते. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, भारती विद्यापीठ, हैदराबादचे विजयकुमार विद्वांस, आमदार पतंगराव कदम यांनीही शुभेच्छा दिल्या. डॉ. अर्जुनराव महाडिक, डॉ. पी. बी. कुलकर्णी, प्राचार्य राजू झाडबुके, प्रा. सुभाष दगडे आदींनी संयोजन केले. प्रा. एस. डी. भोसले यांनी आभार मानले. 

परदेशी अभ्यासक कशाला ? 
डॉ. नाचणे म्हणाले,""डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाने अनेक उत्तम संशोधक निर्माण होऊ शकतात. आर्थिक सुधारणांसाठी परदेशी अभ्यासक बोलावण्यापेक्षा डॉ. पाटील यांच्यासारख्या देशातील अभ्यासकांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.'' 

प्रा. कोरे यांचे एक लाख 

प्रा. व्ही. बी. कोरे यांनी समाजवादी प्रबोधिनीसाठी "सांगाल ती रक्कम देऊ,' असे डॉ. पाटील यांना सांगितले. त्यावर "तुम्हीच निर्णय घ्या' असे पाटील यांनी सांगितले. कोरे यांनी लाखांचा धनादेश देऊ केला. 

चार पुस्तके प्रकाशित 
अमृतमहोत्सवानिमित्त चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. "व्यक्ती, विचार व अर्थ', "नोटाबंदी काही निबंध', "प्रश्‍न पाण्याचा', व "कन्फ्रन्टिंग पॉव्हर्टी' ही पुस्तके डॉ. पाटील यांचे सहकारी, विद्यार्थी व स्वतः पाटील यांनी लिहिली आहेत. नऊशे रुपयांचा संच कार्यक्रमस्थळी सहाशेंत उपलब्ध केला होता. त्याचे सर्व हक्क इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीला दिले. जमा होणारा निधी प्रबोधिनीला देणार असल्याचे डॉ. पाटील यांनी जाहीर केले. प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. 

Web Title: J. F. Patil said the development plan