कर्नाटक बसगाड्यांवर "जय महाराष्ट्र'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

शिवसेनेने दिले हुकूमशाहीला उत्तर : बेग पाकिस्तानात जन्मले काय?

शिवसेनेने दिले हुकूमशाहीला उत्तर : बेग पाकिस्तानात जन्मले काय?
कोल्हापूर - 'जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार, असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्या हुकूमशाही फतव्याला कोल्हापुरात आज शिवसेनेने कर्नाटक बसवर "जय महाराष्ट्र'चे फलक लावून उत्तर दिले. दरम्यान, "जय शिवाजी-जय भवानीसह जय महाराष्ट्र'च्या घोषणेने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसर दणाणून गेला.

"जय महाराष्ट्र'ला बंदी घालणाऱ्या रोशन बेग यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे का? असा सवाल करत कर्नाटक बसवर "जय महाराष्ट्र'चे फलक लावून भगव्या रंगात "जय महाराष्ट्र' लिहून अनोखे आंदोलन केले. बसच्या काचांवर, तसेच चारही बाजूंच्या पत्र्यांवरही "जय महाराष्ट्र' लिहिण्यात आले. भविष्यात असा कोणताही निर्णय घेतला तर त्याला अशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही कर्नाटक सरकारला देण्यात आला. दुपारी बारा वाजता कर्नाटककडून, तसेच मुंबई, पुणे येथून कोल्हापूर बस स्थानकात येणाऱ्या कर्नाटकच्या पंधरा ते वीस बस रोखण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक बसवर "जय महाराष्ट्र'चे फलक लावण्यात आले. भगव्या रंगात लेखनही करण्यात आले.

कर्नाटकात "जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचा कायदा करण्याचे सूतोवाच काल (सोमवारी) कर्नाटकचे नगर विकासमंत्री रोशन बेग यांनी केले होते. यावर महाराष्ट्रासह कर्नाटक सीमा भागात तीव्र पडसाद उमटले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ""जय महाराष्ट्रला बंदी घालणारे रोशन बेग अतिरेकी आहेत का? त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला असावा. त्यामुळे ते तोंडसुख घेत आहेत. त्यांनी अशी वक्तव्ये करणे थांबविले पाहिजे; अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल.''
ते म्हणाले, 'कर्नाटक सरकारने सीमा भागातील लोकांवर अत्याचार केले आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने यात तोडगा काढायला हवा होता; मात्र कोणतीही भूमिका घेतली जात नाही. त्यामुळेच वारंवार असे हुकूमशाही पद्धतीचे फतवे कर्नाटक सरकार काढत आहे. "जय महाराष्ट्र' म्हणण्यालाही बंदी घातली जात असताना राज्य किंवा केंद्र याकडे गांभीर्याने पाहत नाही; मात्र शिवसेना गप्प बसणार नाही. योग्य ते उत्तर देऊच.''