'जलयुक्त'ने मिटविली सोलापूरच्या दुष्काळाची चिंता

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

सोलापूर -  राज्यातील सर्वांत मोठे 117 टीएमसी क्षमता असलेले उजनी धरण असूनही सोलापूरला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. नदी व कालव्याचा भाग सोडला तर पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती ठरलेलीच होती. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या दूरदृष्टीतून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाने जिल्ह्याच्या दुष्काळाची चिंता मिटविली आहे. दोन वर्षांत झालेल्या कामांमुळे चार टीएमसी पाणी आज जिल्ह्याच्या शिवारात थांबले आहे. 

सोलापूर -  राज्यातील सर्वांत मोठे 117 टीएमसी क्षमता असलेले उजनी धरण असूनही सोलापूरला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. नदी व कालव्याचा भाग सोडला तर पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती ठरलेलीच होती. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या दूरदृष्टीतून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाने जिल्ह्याच्या दुष्काळाची चिंता मिटविली आहे. दोन वर्षांत झालेल्या कामांमुळे चार टीएमसी पाणी आज जिल्ह्याच्या शिवारात थांबले आहे. 

अवर्षणप्रवण जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या आता 40च्या घरात पोचली आहे. एकीकडे पाण्याचा अमाप उपसा तर दुसरीकडे प्यायलाही पाणी नाही अशी विषमता जिल्ह्यात होती. टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. मुंढे यांनी पहिल्या वर्षी 280 गावांमध्ये एक लाख 30 हजार 852 हेक्‍टरवर जलयुक्तची पाच हजार 751 कामे पूर्ण केली. दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील 265 गावांमधील 68 हजार 872 हेक्‍टरवर दोन हजार 198 कामे पूर्ण केली. 

सलग दोन वर्षे सोलापूरकडे पाठ फिरविलेल्या पावसाने यावर्षी मात्र जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पहिल्या वर्षातील 280 व दुसऱ्या वर्षातील 265 गावांमध्ये सध्या 99 हजार 273 टीसीएम (जवळपास चार टीएमसी) पाणी साठले आहे. साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर करत श्री. मुंढे यांनी देशात जलयुक्तच्या कामाचा सोलापूर पॅटर्न निर्माण केला होता. महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यांनीही या पॅटर्नची दखल घेतली. मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर तेव्हा आक्षेप घेणारी मंडळी आता मात्र शिवारात थांबलेले पाणी पाहून त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. 
 

सूक्ष्म सिंचनाचे काम राहूनच गेले... 
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रत्येक गावात शाश्‍वत पाणी उपलब्ध करणे, अडविलेल्या पाण्याचा शास्त्रोक्त व सूक्ष्म पद्धतीने वापर व्हावा यासाठी ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करणे, यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यातून कर्जाची तरतूद करणे असा प्रभावी आराखडा श्री. मुंढे यांनी आखला होता. अभियानातून पहिल्या वर्षी कामे झाली; परंतु पावसाने पाठ फिरवली. राजकीय दबावामुळे श्री. मुंढे यांची 17 महिन्यांतच बदली झाली. यंदा मुबलक पाऊस झाला; परंतु प्रभावी नियोजन करणारी व्यक्तीच सध्या जिल्ह्याच्या प्रशासनात व राजकारणात नाही. शिवारात अडविलेल्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म सिंचनाचे काम राहून गेल्याची खंत आता व्यक्त होत आहे. 
 

आकडे बोलतात... 
जलयुक्त शिवार अभियानातून 
दोन वर्षांत झालेल्या कामांची संख्या 
* कंपार्टमेंट बंडिंग : 5690 
* सलग समतल चर : 80 
* माता नाली बांध : 672 
* खोल सलग समपातळी चर : 123 
* शेततळे : 789 
* सिमेंट नाला बांध : 575