जत पालिकेत झेरॉक्‍स मशीन खरेदीत घोटाळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

1 लाख 700 रुपयांची मशीन 2 लाख 550 रुपयांना - उमेश सावंत यांची चौकशीची मागणी 

जत - नगरपालिकेने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात खरेदी केलेले झेरॉक्‍स मशीन बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने खरेदी केली. या व्यवहारात नगराध्यक्ष इकबाल ऊर्फ पटू गवंडी व तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे. याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक उमेश सावंत यांनी केली आहे. 

सावंत म्हणाले, 'पालिकेची पहिली टर्म संपत आली आहे. या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी एकही भरीव काम केले नाही. पालिकेचे उत्पन्न कमी असल्याने विकासाला चालना मिळाली नाही. मात्र असलेल्या उत्पन्नात चांगली कामे करणे आवश्‍यक होते. सत्ताधाऱ्यांनी पैशाची उधळपट्टी केली. अनेक खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार केला आहे. पालिकेने 11 नोव्हेंबर 2016 ला झेरॉक्‍स मशीन खरेदी केली आहे. ही खरेदी करताना कोटेशनची जाहिरात देणे गरजेचे होते. तसे न करता ठरावीक कोटेशन घेण्यात आले. मशीन बाजार भावापेक्षा दुपटीने खरेदी आहे. पालिकेने सातारा येथील स्वस्तिक एंटरप्राईजेस या दुकानातून रिको कंपनीची एम पी 2501 हे मॉडेलची मशीन खरेदी केली. यासाठी 2 लाख 550 रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र याच कंपनीची याच मॉडेलची किंमत 1 लाख 700 रुपये आहे. या मशिनच्या खरेदीवर कंपनी 10 टक्‍के डिसकाउंट देते म्हणजे मशीन केवळ 90 हजार 630 रुपयांत मिळते. असे असताना पालिकेने मात्र यासाठी दोन लाख रुपये खर्च का केले? यात नगराध्यक्ष इकबाल गवंडी व तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी संगनमत करून पैसे हडप केले आहेत. या खरेदी व्यवहाराची चौकशी होणे आवश्‍यक आहे. 

पालिकेचे उत्पन्न कमी असल्याने विकास कामांना खीळ बसली आहे. असे असताना पालिकेने अनेक खरेदी व्यवहारात उधळपट्टी केली आहे. निवडणुका जवळ आल्याने विकास कामे केल्याचा आव आणला जात आहे. प्रत्यक्षात पालिकेचा कारभार भ्रष्ट सुरू आहे. विकास कामे कामावर भर द्यायचे सोडून भ्रष्टाचार केलेले मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना परत आणण्यासाठी धडपड केली जात आहे. 

चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार 
नगरपालिकेतील सत्ताधाऱ्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. प्रत्येक कामात व खरेदी व्यवहारात मोठा गोलमाल झाला आहे. झेरॉक्‍स मशीन हा एक नमुना आहे. त्यांनी केलेल्या सगळ्या कामातील भ्रष्टाचार जनतेसमोर आणू. या भ्रष्टाचाराची चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.