ज्योतिबाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

ज्योतिबा डोंगर - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेस आज पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. तसेच ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सर्व सासनकाठ्या, तसेच ज्योतिबासह परिसरातील सासनकाठ्या आकर्षक सजावटीने सजवून त्या दिमाखात उभ्या केल्या. ज्योतिबा देवाच्या मुख्य यात्रेचा दिवस दहा एप्रिलला आहे.

आज श्री ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील सरदारी रूपातील आकर्षक महापूजा बांधली. ही पूजा वर्षातून एकदाच बांधण्यात येते. देवदास भिवदर्णे, रामचंद्र भिवदर्णे, पांडुरंग भंडारे, नवनाथ भिवदर्णे, दीपक भिवदर्णे यांनी ही महापूजा बांधली. आज सकाळी 11 वाजता निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मत बहाद्दूर चव्हाण-सरकार यांची मानाची सासनकाठी डोंगरावर दाखल झाली.

हलगी, पिपाणी, सनईच्या सुरात भाविक, ग्रामस्थ, पुजारी यांनी ही सासनकाठी नाचविली. भाविकांनी काठीवर गुलाल व खोबऱ्याची उधळण केली. दुपारी साडेबारा वाजता ज्योतिर्लिंग मंदिराच्या मंडपात गुढी पाडव्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे पंचांग वाचन झाले. केदारी उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले.

निनाम पाडळी (जि. सातारा), मौजे विहे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (ता. कऱ्हाड), छत्रपती (करवीर), कवठेगुलंद (सांगली), मनपाडळे (ता. हातकणंगले), तसेच सांगली, सातारा, सोलापूर, बार्शी, लातूर, बीड या भागातील मानाच्या सासनकाठ्या त्या त्या गावात उभ्या करून चैत्र यात्रेसाठी केव्हा निघायचे, याचे नियोजन झाले.