जोतिबाचे दर्शन अन्‌ पोटभर जेवणही...! 

जोतिबाचे दर्शन अन्‌ पोटभर जेवणही...! 

कोल्हापूर - दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्री यात्रा येत्या सोमवारी (ता. 10) होणार असून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राच्या तयारीला आता प्रारंभ झाला आहे. शनिवार (ता. 8) पासून यात्रेला प्रारंभ होणार असून सलग चार दिवस भाविकांना ही सेवा मिळणार आहे. बैलगाड्या घेऊन येणाऱ्या भाविकांच्या बैलांना चारा व पाण्याची सोयही केली जाणार आहे. दरम्यान, यंदा व्हाईट आर्मीच्या पुढाकाराने भाविकांसाठी सहा बेडचे एसी हॉस्पिटल उभारले जाणार असून शनिवार (ता. 8) पासून सर्व प्रकारच्या आपत्कालीन सुविधा पुरवल्या जाणार आहेत. 

 अन्नछत्रांची सुविधा 
सहजसेवा ट्रस्टतर्फे सलग 17 व्या वर्षी मोफत अन्नछत्राचे आयोजन केले आहे. 8 ते 10 एप्रिलदरम्यान गायमुख परिसरात 24 तास भाविकांना मोफत भोजनाची सुविधा येथे उपलब्ध असेल. किमान अडीच लाख भाविक अन्नछत्राचा लाभ घेऊ शकतील, या अपेक्षेने आवश्‍यक ते सर्व नियोजन केले आहे. यात्रा काळात संभाव्य पावसाच्या पार्श्‍वभूमीवर 15 हजार चौरस फुटांचा फॅब्रिकेटेड मंडप उभारला आहे. महिलांना आंघोळीसाठी बाथरुम्स, पार्किंग व्यवस्थाही केली जात आहे. ग्रामीण भागातील भाविकांना रक्तदानाचे महत्त्व समजावे, यासाठी चार दिवस रक्तदान शिबिरही होणार असून त्यासाठी स्वतंत्र मंडप उभारला आहे. शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे पंचगंगा घाटावर सलग 23व्या वर्षी अन्नछत्राचे आयोजन होणार आहे. पंचगंगा घाटावर अन्नछत्रासाठी चार हजार चौरस फुटांचा मंडप उभारला असून सुमारे एक लाख भाविकांना पोटभर भोजन घेता येईल, इतकी व्यवस्था मंडळाने केली आहे. गणेश सावंत यांच्या गणेश कॅटरर्सचे शंभर आचारी कार्यरत राहणार आहेत. 9 ते 11 एप्रिल या काळात हे अन्नछत्र सुरू असेल. 

सलग 23व्या वर्षी आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नछत्राचे आयोजन होणार आहे. 9 ते 11 एप्रिल असे तीन दिवस भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे. सुमारे दीड लाख भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. 

अन्नछत्रातील मेन्यू असे 
मसाले भात, कुर्मापुरी, आमटी, कांदा भजी, जिलेबी, शिरा, बुंदी, बुंदीचे लाडू, मठ्ठा, ताक, कोशिंबीर, लोणचे, पापड असे मेन्यू असतील. त्याशिवाय मोफत चहा, नाष्ट्याची सेवाही दिली जाईल. 

शंभरहून अधिक बसेस 
जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर एसटी महामंडळाने बसस्थानक उभारले असून 114 बसेस भाविकांच्या सेवेसाठी सज्ज असतील. एक वाहतूक नियंत्रक, दोन वाहतूक अधिकारी आणि 11 वाहतूक पर्यवेक्षकांची टीम येथे कार्यरत असेल. विविध 11 आगारांतूनही भाविकांच्या संख्येनुसार जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 

60 डॉक्‍टरांची टीम 
जीवनमुक्ती - व्हाईट आर्मीच्या वतीने यंदाही सुसज्ज हॉस्पिटल उभारले जाणार आहे. गेल्या 8 वर्षांत संस्थेच्या या हॉस्पिटलचा 16 हजारांवर भाविकांना लाभ झाला आहे. यंदाही सलग चार दिवस ही सुविधा असेल. यंदा ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या सहकार्याने सहा बेडचे सुसज्ज एसी हॉस्पिटल उभारले असून जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन, होमिओपॅथी प्रॅक्‍टिशनर्स "निहा' असोसिएशनचे सहकार्य मिळाले आहे. डॉ. संदीप पाटील, डॉ. राजेश सातपुते, डॉ. शिवाजी मगदूम, डॉ. शिवराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 60 डॉक्‍टरांची टीम येथे दररोज दोन शिफ्टमध्ये कार्यरत असेल. वायरलेस सेटसह रेस्क्‍यू टीम मंदिर परिसरात तैनात असेल. भाविकांना सुलभ व जलद दर्शन, गर्दीवर नियंत्रण आदींसाठी व्हाईट आर्मीची टीम कार्यरत असेल. हृदयरुग्णांसाठी दिलासा म्हणून हार्ट ब्रिगेड ऍम्ब्युलन्सची सोय येथे असेल. व्हाईट आर्मी आणि श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या रुग्णवाहिका कार्यरत असतील. त्याशिवाय भाविकांसाठी विश्रामगृहाची सुविधाही यंदा असेल. जोतिबा मंदिर, यमाई मंदिर, सेंट्रल प्लाझा आदी ठिकाणी आपत्कालीन कक्ष असेल. पोलिस व देवस्थान समितीशी हे कक्ष समन्वय साधतील, अशी माहिती व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी दिली. 

मोफत वाहन दुरुस्ती 
कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने यात्रेनिमित्त रविवार (ता. 9) पासून यात्रा संपेपर्यंत मोफत टू व्हीलर सर्व्हिस कॅम्पचे आयोजन यंदाही केले आहे. जोतिबा डोंगर व परिसरात टू व्हीलर नादुरुस्त झाल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनने केले आहे. विजय पाटील (9423371545), भाऊ पाटील (9822206155), विजय माने (9420779073), पप्पू गवळी (9665722916), रमेश बावले (9822681789) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com